यवतमाळ : महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होत आहे. या सरकारमध्ये यवतमाळला समाधानकारक वाटा मिळण्याची शक्यता असून, आमदार अशोक उईके, आमदार मदन येरावार यांच्यासह आमदार संजय राठोड यांनाही लालदिवा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
काँग्रेस सरकारच्या काळात पूर्वी यवतमाळ जिल्ह्याला कायम तीन ते चार मंत्रिपदे असायची. त्याची पुनरावृत्ती यावेळी होईल, अशी अपेक्षा यवतमाळकरांतून व्यक्त केली जात आहे. प्राचार्य डाॅ. अशोक उईके हे राळेगाव या अनुसूचित जमाती या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. नगरसेवक पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या उईके यांनी यापूर्वी आदिवासी खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. २०१९ मध्ये दुसऱ्या वेळी विधानसभेवर निवडून आलेल्या उईके यांनी ९० हजार ८२३ मते घेत काँग्रेस उमेदवार प्रा. वसंत पुरके यांचा पराभव केला होता, तर आमदार मदन येरावार यांची १९९१ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कारकीर्द सुरू झाली. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस, त्यानंतर नगरसेवक, २००४ ते २००९ त्यानंतर २०१४ ते २०१९ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग तिसऱ्या वेळी विजय मिळविला. या निवडणुकीत आमदार येरावार यांनी ८० हजार ४२५ मते मिळवून काँग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगूळकर यांचा निसटत्या फरकाने पराभव केला होता. मांगूळकर यांना ७८ हजार १७२ एवढी मते मिळाली होती. २०१६ ते २०१९ या कालावधीत राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. दिग्रस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले संजय राठोड यांनीही २००४ ते २००९, २००९ ते २०१४ आणि २०१४ ते २०१९, असा सलग तीनदा विजय मिळविला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १ लाख ३६ हजार ८२४ मते मिळवीत त्यांनी अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांचा पराभव केला होता. देशमुख यांना ७३ हजार २१७ मते मिळाली होती. २०१४ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत संजय राठोड महसूल राज्यमंत्री होते. जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२१ या काळात त्यांच्याकडे वन व भूकंप पुनर्वसन मंत्रिपद होते. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे.
आ. अशोक उईके, आ. मदन येरावार आणि आ. संजय राठोड यांना मंत्रिपदाची लाॅटरी लागल्यास जिल्ह्याच्या विकासकामांना वेग मिळेल, अशीही अपेक्षा आहे. त्यातच पालकमंत्री कोण राहणार, हा मुद्दाही महत्त्वाचा असणार आहे. संदीपान भुमरे यांनी पालकमंत्री म्हणून काही काळ जबाबदारी सांभाळली असली तरी ते औरंगाबादहून कारभार पाहत असल्याचा आरोप होत होता. त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्यातील मंत्र्याकडेच पालकमंत्रिपद राहण्याची शक्यता आहे.
...तर यवतमाळच्या विकासाला गती
संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्याकडे एकही मंत्रिपद नव्हते. १६ तालुक्यांचा भार असलेल्या या जिल्ह्याला यावेळी लालदिवे मिळण्याची शक्यता असून, पालकमंत्री पदही जिल्ह्याकडेच राहिल्यास विकासाला पुन्हा गती मिळेल.