शेतकरी आक्रमक : पॉवर ग्रीड कंपनीची महागाव तालुक्यात मनमानी टॉवर उभारणी महागाव : टॉवर उभारण्याच्या कामामुळे पिकांचे आणि जमिनीचे असे दोन्ही स्तरावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला रोख स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत टॉवरच्या कामाला हात लावू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे टॉवर उभारणीच्या या मनमानी कारभाराचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. पावर ग्रीड कॉरपोरेशन आॅफ इंडिया नांदेड कंपनीच्यावतीने ७६५ केव्ही वरोरा (चंद्रपूर) ते परळी पारेषण लाईनचे काम सुरू आहे. या कामासाठी ठिकठिकाणी टावर उभारले जात आहे. परंतु टॉवरच्या उभारणीत महसूल बुडविला जात असून शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले. त्यावरून महागाव येथील तहसीलदार नामदेव इसाळकर यांनी कंपनीला २५ लाख २८ हजार रुपयांचा दंड ठोठावला. अशा प्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. परंतु यानंतरही कंपनीचे अधिकारी भारत सरकारचे काम असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धमकावित आहे. त्यामुळे वरोरा ते परळी मार्गावरील शेतकरी संतप्त झाले आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे नेतृत्व महागावचे प्रशांत गावंडे करीत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळणार नाही तोपर्यंत कामाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. नेर तालुक्यातील सिंदखेड येथील माजी सरपंच परशराम राठोड, देवराव राठोड, उमेश राठोड, मीनल राठोड यांनी नेर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दोन वर्षांपासून कंपनीने मोबदला दिला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला मिळणे कठीण झाले आहे. परभणी जिल्ह्यातील आनंदवाडी येथील सुभाष नामदेव लवटे, परमेश्वर भगवान लवटे, ज्ञानदेव सदाशिव भाळे, गोविंद मसनाजी लवटे, अर्जून भाऊराव लवटे, रामेश्वर सुदाम लवटे यांनी कंपनीच्या मनमानीला विरोध करत काम थांबविले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे. महागावमधून शेतकऱ्यांनी लढा उभारल्यानंतर येथील टॉवर उभारणीचे काम थांबविण्यात आले आहे. जेथे अर्धवट काम आहे त्या ठिकाणी टॉवरवरील फिरक्या हवेमुळे कोसळण्याची भीती आहे. यामुळे कंपनीचे अधिकारीही हैरान झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
मोबदला मिळेपर्यंत काम होऊ देणार नाही
By admin | Published: April 03, 2017 12:23 AM