अनेक घरांची झाली पडझड : गहू, हरभरा झाला आडवा, महसूल विभागाने सर्व्हे करण्याची मागणी वणी : सुलतानी संकटासोबतच नैैसर्गीक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजात वादळी पावसामुळे पुन्हा एकदा धडकी भरली आहे. गुरूवारी सायंकाळी वणी उपविभागात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने बळीराजा पुुन्हा एकदा कोलमडून पडला आहे. या वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली, तर काही घरांची छपरे उडून गेली. वादळाने ज्यांची घरे उध्वस्त केली. त्या आपतग्रस्तांना शासकीय योजनेतून घरकुल द्यावे, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वादळी पावसाला सुरूवात झाली. उपविभागातील वणीसह मारेगाव, झरी या तालुक्यांमध्ये वादळाने अक्षरश: तांडव घातले. झरी, मारेगाव तालुक्यातील काही भागात गारपीटही झाली. यामुळे गहू आणि हरभरा या पिकाला चांगलाच फटका बसला. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तुरीची कापणी करून त्याचे शेतातच ढिगारे उभे केले होते. काहींच्या शेतात चना ठेवून होता. मात्र वादळी पावसाने हे पीक नेस्तनाबूत झाले. वणी तालुक्यात ६५०० हजार हेक्टरवर चना पिकांची लावगड करण्यात आली असून तीन हजार १०० हेक्टरवर गव्हाचा पेरा करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी जवळपास एक तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वणी तालुक्यातील शिंदोला, कुर्ली यासह अनेक गावातील घरांचे नुकसान झाले. कुर्ली येथील सहदेव ढेंगळे यांच्या घरावर झाड कोसळल्याने स्लॅबला तडे गेले. तर गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेल्यामुळे गावकऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागले. तालुक्यातील कळमना येथील अनेक घरांच्या भिंती कोसळल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबदेखिल वाकेले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात यावे व ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना पंतप्रधान योजनेतून घरकुल देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) मारेगाव तालुक्यात मिरची, संत्र्याचे नुकसान तालुक्यातील कुंभा परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी मिरची व संत्र्याचे उत्पादन घेतले आहे. मात्र गुरूवारी झालेल्या अकाली पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात गारपीट झाल्यामुळे मिरच्या खाली गळाल्या आहे. परिणामी मिरच्याची पत खालावली असून काही मिरच्या सडलेल्या अवस्थेतसुद्धा असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान तालुक्यात वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टर जमिनीतील रब्बी पिकाचे नुकसान झाले. गहु, हरबरा या पिकाला अक्षरश: झोडपून काढले. सर्वाधिक नुकसान बोथ, बहात्तर, भाडउमरी, कोपामांडवी, वाऱ्हा, कवठा, पाटणबोरी, पिंपरीबोरी या गावांना बसला. हाती आलेली पिके निसर्गाने हिरावून नेल्यामुळे त्याच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. उसनवारी करुन, कर्ज काढून रब्बी पिकाची पेरणी केल्यानंतर त्याची जोपासना पोटच्या पोरासारखी केली. परंतु हाती आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. झरी तालुक्यात दमदार गारपीट तालुक्यातील मुळगव्हाण शिवारात गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच मांगली येथील श्रीनिवास चामाटे यांच्या शेतातील केळी व शेवगा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील टाकळी, पाटण, माथार्जुन, हिरापूर, मांगली, लहान पांढरकवडा, राजूर या भागातील कापूस खाली पडून मातीत मिसळला आहे. त्याचबरोबर सायंकाळी तालुक्यातील विद्युत पुरवठासुद्धा खंडित झाला होता. गावात नळ न आल्यामुळे पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता.
वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या काळजात धडकी
By admin | Published: March 18, 2017 12:56 AM