लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार खासदार भावना गवळी पहिल्या फेरीपासून आघाडीवर होत्या. प्रत्येक फेरीनंतर त्यांच्या रिसोड (जि.वाशिम) या गावात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन एकप्रकारे दिवाळीच साजरी केल्याचे चित्र दिसून आले.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये शिवेसेनेच्या खासदार भावना गवळी व काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये लढत झाली. सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी झाली. त्यामध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी १०११ मतांनी आघाडीवर होत्या. सुरुवातच आघाडीने झाल्याने रिसोडात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्यापेक्षा त्यांना ९४७ मते मिळाली. त्यानंतर ‘लिड’ ४२४ मतांवर आल्याने कार्यकर्त्यांमधला उत्साह कमी झाला होता. परंतु आत्मविश्वास असलेल्या कार्यकर्त्यांनी तिसऱ्या फेरीमध्ये ४९९० मतांची आघाडी घेतल्यानंतर फटाके फोडण्यास सुरुवात केली. ही फटाक्यांची आतषबाजी नंतर सतत सुरुच होती. कारण यानंतर मोठ्या फरकाने खासदार भावना गवळी मतांची आघाडी घेताना दिसून आल्यात. भावना गवळी यांनी सहाव्या फेरीपासून मोठी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये वाढच झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढताना दिसून आला. यावेळी रिसोडात सर्वत्र फटाक्यांची आतषबाजीसह अनेक कार्यकर्त्यांनी भावना गवळी यांना विजय घोषित करण्याआधीच एकमेकास पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केल्याचे दिसून आले. रिसोड शहरातील अनेक चौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी झाली. कार्यकर्त्यांमधील उत्साहाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी रिसोड तालुकाध्यक्ष महादेव ठाकरे, विश्वनाथ सानप, डॉ. चंद्रशेखर देशमुख, नगरसेवक पवन छित्तरका, शिवसेना शहरप्रमुख अरुण मगर, नगरसेवक कपिल कदम, सागर क्षीरसागर, सुभाष चोपडे, चाफेश्वर गांगवे, रणजित इंगळे, विकास देशपांडे, नरहरी अवचार, रवी देशमुख, रामा वैद्य, साहेबराव सपकाळ, नितीन सरनाईक, देवानंद नरवाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
विजयी उमेदवार भावना गवळी यांच्या रिसोड गावात साजरी झाली दिवाळीफटाके फोडून पेढे वाटले । निवडणूक निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:12 PM
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार खासदार भावना गवळी पहिल्या फेरीपासून आघाडीवर होत्या. प्रत्येक फेरीनंतर त्यांच्या रिसोड (जि.वाशिम) या गावात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन एकप्रकारे दिवाळीच साजरी केल्याचे चित्र दिसून आले.
ठळक मुद्देघोषित होण्याआधीच रिसोड शहरात जल्लोष