यवतमाळ : जिल्ह्यातील स्वामिनी दारूबंदी अभियान आणि विविध संघटनांकडून यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी घोषित करावी, यासाठी दोन वर्षांपासून आंदोलने सुरू आहे. यामध्ये हजारो महिला व नागरिकांचा पाठिंबा लाभत आहे. याच लोकचळवळीचा एक भाग म्हणून यावेळी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर स्वामिनी दारूबंदी अभियानाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक धडक मोर्चाच्या माध्यमातून आपली मागणी मांडणार आहे. स्वामिनी दारूबंदी अभियान, दारूबंदी आंदोलन समिती, दारूबंदी आंदोलन परिषद वणी, गुरूदेव सेवा मंडळ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला संस्था आदी समित्यांचे व संस्थांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार आहे. यवतमाळ जिल्हा दारूबंदी घोषित झालाच पाहिजे, या मागणीसाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून ४ डिसेंबरला चिंतामणी देवस्थान कळंब येथून ही पदयात्रा निघणार असून ९ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकेल. यामध्ये जवळपास १० हजार महिला सहभागी होतील. हिवाळी अधिवेशनात शासनाने यवतमाळ जिल्हा दारूबंदी करावा, ही मुख्य मागणी नागरिकांची आहे. या पदयात्रेत स्वराज अभियानाचे योगेंद्र यादव, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, सर्च संस्थेचे अभय बंग व राणी बंग, श्याम मानव, प्रतिभा शिंदे, राजेंद्रसिंह राणा आदी समाजसेवी मंडळी सहभागी होणार आहे. महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक महेश पवार, प्रा.घनश्याम दरणे, प्रज्ञा चौधरी, मनीषा काटे, अंजू चिरोलकर, प्रकाश घोटेकर, नितीन मिर्झापुरे आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा दारूबंदीसाठी स्वामिनी धडकणार हिवाळी अधिवेशनावर
By admin | Published: November 19, 2015 3:12 AM