यवतमाळ : वादळी पावसाने जिल्ह्यात तीन दिवसात २८ हजार ४२७ हेक्टरील रबी पिकांचे नुकसान झाले. या सोबतच कापसालाही मोठा फटका बसला असून सततच्या पावसाने कापसातील सरकी अंकुरण्याच्या अवस्थेत आहे. तर हवामानाच्या बदलाने पणन महासंघाने कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केली आहे.जिल्ह्यात ८४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात गहू आणि हरभरा काढणीला आला होता. मात्र निसर्गाच्या अवकृपेच फटका या पिकांना सोबतच संत्रा, केळी, पपई, भाजीपाला पिकांना बसला. तीन दिवस बरसलेल्या पावसाने गहू मातीमोल झाला. सर्वत्र शेतात गहू झोपल्याचे दिसत आहे. ४३३ गावातील पिकांना वादळाचा जबर फटका बसला आहे. दोन दिवसात सरासरी ४८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सर्वाधिक ४५ मिमी पावसाची नोंद यवतमाळात करण्यात आली. अनेक शेतात उशिरा पेरणी झालेला पऱ्हाटी आहे. पऱ्हाटीला मोठ्या प्रमाणात कापूस लागला आहे. मात्र वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने हा कापूस शेतातच होता. त्यालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. ओल्या झालेल्या कापसाच्या सरकीला अंकुर फुटत आहे. तर दुसरीकडे पणन महासंघाने ढगाळी वातावरण लक्षात घेता कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी मोठा अडणीत सापडला आहे. (शहर वार्ताहर)
तीन दिवसात २८ हजार रबीचे क्षेत्र उद्ध्वस्त
By admin | Published: March 04, 2015 1:48 AM