दिग्रस : विदर्भ हा पूर्वीपासून निसर्गदत्त संपत्ती व साधनांनी परिपूर्ण आहे. विदर्भाच्याच भरोश्यावर महाराष्ट्राची शान आहे. मात्र आम्हाला वीज कमी दिली जाते, नोकऱ्यांची टक्केवारी कमी, बजेटमध्ये निधी कमी दिला जातो. त्यामुळेच विदर्भातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न तुलनेत कमी आहे. कुपोषण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. हे मागासलेपण दूर करून जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही, असा सूर ‘वेगळा विदर्भ का’ या विषयावरील भाषणातून निघाला. विदर्भ गर्जना यात्रेचे दिग्रस येथील गुरुवारी आगमन झाल्यानंतर शिवाजी चौकात एक सभा घेण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक वामनराव चटप, कोअर कमिटी सदस्य धर्मराज रेवतकर, विष्णू आष्टीकर, अण्णा राजेश्वर, प्रदीप देशपांडे, दत्ता चांदुरे, रंजना गांगुर्डे, राजेंद्र आगरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीसाठी सदस्यत्व स्वीकारले. यावेळी विदर्भातील मागासलेपण आणि पश्चिम महाराष्ट्राने केलेला अन्याय या विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला दीपक आनंदवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र राऊत, खंडू महाराज, डॉ. विठ्ठल घाडगे, शरद पडगीलवार, मधुकर कानतोडे, प्रदीप खंडारे, राजूसिंग नाईक, मुकेश डंभारे, राजा चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला दिग्रसकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)