खरेदीवर प्रश्नचिन्ह : १५ हजार शालेय विद्यार्थी प्रतीक्षेत, ४०० रुपयांत दोन गणवेश देणार महागाव : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळाले नसून ६१ लाख रुपयांच्या शालेय गणवेश खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल १५ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत असून स्वातंत्र्य दिनापर्यंत तरी गणवेश मिळतील काय, असा सवाल विद्यार्थी करीत आहे. महागाव तालुक्यातील १५ हजार ४१२ विद्यार्थ्यांसाठी ६१ लाख ६४ हजार रुपये तीन महिन्यांपूर्वी सर्वशिक्षा अभियानाने गणवेश खरेदीसाठी मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा केले आहे. गणवेश खरेदीचा मात्र अद्यापही मुहूर्त निघाला नाही. शाळा व्यवस्थापन समितीने गणवेशाचा रंग कोणता असावा, ते स्वतंत्र ठरवाचे आहे. असे असले तरी ज्या शाळेच्या संपर्कात गणवेश पुरवठादार एजंट आहे, त्यांच्यात पसंतीनुसार गणवेश खरेदी सुरू आहे. एजंटाने अद्यापही शाळेला गणवेश पुरुवठा केला नाही. त्यामुळे नेहमीच्या कपड्यातच विद्यार्थी शाळेत येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश मोफत द्यावयाचे असून दोन गणवेशासाठी ४०० रुपये किमत निर्धारित करण्यात आली आहे. पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची संख्या नऊ हजार ७२६ आणि अनुसूचित जातीचे १२४६, अनुसूचित जमातीचे १३३२ तसेच दारिद्र्यरेषेखालील ३१०८ विद्यार्थी आहे. २७ जून रोजीच या विद्यार्थ्यांना कपडे मिळणे अपेक्षित होते. परंतु रंगाचा घोळ सुरू असल्याने अद्यापही कपडे मिळाले नाही. ४०० रुपयांत दोन गणवेश बसवायचे असल्याने आणि त्यातही कमिशन मिळवायचे असल्याने या गणवेशाचा दर्जा निश्चितच खालावलेला राहणार आहे. २५ प्रतिमीटरप्रमाणे कपडा खरेदी करून त्यातून कपडे शिवले जाणार असल्याची माहिती आहे. परंतु स्वातंत्र्य दिन आला तरी गणवेश मिळाले नाही. १५ आॅगस्टपर्यंत गणवेश मिळतील की नाही, अशी शंका आहे. (शहर प्रतिनिधी) पुसदच्या एजंटचे दिल्ली कनेक्शन स्वस्तात स्वस्त गणवेश पुरविण्यासाठी पुसद येथील एका शिक्षकाच्या नातेवाईकाने चांगलीच शक्कल लढविली. ४०० रुपयांत दोन गणवेश देण्यासाठी त्याने थेट दिल्लीशी कनेक्शन जुळविले. दिल्लीवरूनच गणवेश तयार होवून येणार असून दोन गणवेश केवळ २५० रुपयात तयार होणार असल्याची माहिती आहे. दिल्ली येथील एजंटाने पाच कलरच्या गणवेशाचे सॅम्पल प्रत्येक शाळेत दाखविले होते. कपड्याचा दर्जा मात्र निकृष्ट असल्याने अनेक शाळांनी ते नाकारल्याची माहिती आहे.
महागाव तालुक्यातील विद्यार्थी गणवेशाविनाच
By admin | Published: July 21, 2016 12:25 AM