लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाटणबोरीलगत असलेल्या वाऱ्हा शिवारातील शेतात काम करित असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार मारले. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. लक्ष्मीबाई भिमराव दडांजे (६८) असे मृत महिलेचे नाव असून ती अंधारवाडी येथील रहिवासी आहे. घटनेनंतर वाघ बराच वेळ घटनास्थळावर ठिय्या देऊन होता.
दरम्यान, नागरिक व वनविभागाच्या पथकाने आरडाओरड करून वाघाला घटनास्थळावरून पिटाळून लावले. त्यानंतर मृत लक्ष्मीबाईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. शनिवारी दुपारी लक्ष्मीबाई दडांजे तिचा मुलगा बापुराव दडांजे हे दोघे वाºहा शिवारात असलेल्या शेतात काम करित होते. बापुराव फवारणी करित होता, तर लक्ष्मीबाई कपाशी पिकातून जाण्यासाठी रस्ता तयार करित होती. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कपाशीत लपून बसलेल्या वाघाने अचानक लक्ष्मीबाईवर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली. ही बाब बापुरावला कळताच, त्याने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
शिकार केल्यानंतरही वाघ मृतदेहाजवळच थांबून होता. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अर्ध्या तासाने पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी व वनविभागाच्या पथकाने आरडाओरड करून वाघाला घटनास्थळावरून हुसकावून लावले.गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. वनविभागाच्या मते, हल्लेखोर वाघिण असून ती गर्भवती आहे. गर्भधारणेच्या काळात आवश्यक तो आहार मिळत नसल्याने ती आता सातत्याने जनावरे व माणसांवर हल्ले करित असल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्पेशल टायगर फोर्स या वाघिणीच्या मागावर असून तिच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहे. या वाघिणीला पकडून जेरबंद करण्याचा वनविभागाचा प्लॅन असला तरी अद्याप त्यात यश आलेले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये वनविभागाप्रती प्रचंड रोष दिसून येत आहे.