यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात प्रेयसीनेच जावयाच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची बाब चौकशीअंती उजेडात आली. १९ डिसेंबरच्या रात्री राजूर कॉलरी येथे ही घटना उजेडात आली हाेती. वणी पेालिसांनी या प्रकरणाचा चहूबाजूंनी तपास करून घटनेचा उलगडा करीत मृताची प्रेयसी व जावयाला गुरुवारी अटक केली.
अतुल सहदेव खोब्रागडे असे मृताचे नाव असून, तो राजूर कॉलरी येथील चुनाभट्टीवर काम करीत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे त्याच गावातील सोनू राजू सरावने (२५) या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून अतुल खोब्रागडे व सोनू सरावने हे लपूनचोरून भेटायचे. ही बाब सोनूचा जावई हर्षद अंबादास जाधव याला खटकत होती. यावरून सोनू व हर्षदमध्ये अनेकदा वादही झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
१९ डिसेंबरला सायंकाळी नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या सोनूच्या दुसऱ्या घरात अतुल व सोनू एकमेकांना भेटले. काही वेळानंतर तेथे हर्षदही पोहोचला. या ठिकाणी सोनू, हर्षद व अतुल यांच्यात वाद झाला. या वादात सोनू व हर्षद या दोघांनी मिळून घरातच अतुलच्या तोंडावर उशीने दाबले. त्यानंतर गळा दाबून त्याला ठार मारले. प्रकरण अंगलट येईल, या भीतीने या दोघांनी अतुलचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा देखावा निर्माण केला. त्याचा मृतदेह घरातून ओसरीत आणून ठेवण्यात आला.
२० डिसेंबरच्या सकाळी त्या ठिकाणी मृतदेह पडून असल्याचे काही लोकांना दिसले. या संदर्भात लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. अतुलचा मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक याबद्दल तर्कवितर्क सुरू असतानाच शवविच्छेदन अहवालातून त्याचा गळा आवळून खूनच झाल्याची बाब पुढे आली. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रार देण्यासाठी मृताचे एकही नातेवाईक पुढे आले नाहीत. त्यामुळे अखेर या घटनेत फिर्यादीच पोलीस बनले. साहाय्यक फौजदार डोमा भादीकर यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी वर्तविली.
उलटे बूट, छातीवर मोबाईल अन् स्वेटर मृतदेहाशेजारी
राजूरा येथील घटनास्थळी घराच्या वस्तीत अतुल खोब्रागडेचा मृतदेह पडून होता. यावेळी त्याच्या डाव्या पायातील बूट उजव्या पायात होता, तर उजव्या पायातील बूट डाव्या पायात होता. त्याचा मोबाईल त्याच्या छातीवर ठेवून होता, तर अंगातील स्वेटर बाजूला पडून होते. त्यामुळे हा खूनच असल्याच्या शंकेची पाल पोलिसांच्या मनात चुकचुकली आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास करून अवघ्या तीन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला.