कमलाबाई लालजी ठाकरे (रा. पडसा) असे शेतकरी महिलेचे नाव आहे. त्यांनी १५ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. अंगठा लावूनही आधार प्रमाणीकरण होत नसल्याच्या कारणांचा शोध घेण्याकरिता त्यांनी संबंधित बँक, सहायक उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, तहसील कार्यालय आदींकडे अर्ज, विनंत्या केल्या. स्वत: खेटे घालूनही संबंधित अधिकारी नेमके कारण न सांगता, एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करून मोकळे होतात.
कमलाबाई ठाकरे यांनी येथील स्टेट बँकेतून १० नोव्हेंबर २०१४ रोजी ४९ हजार, २५ जून २०१५ रोजी ६६ हजारांचे पीक कर्ज उचलले. हे कर्ज माफ झाल्याचे बँकेकडून व संबंधित खात्याकडून त्यांना कळविण्यात आले. त्यामुळे त्यांनी सुविधा केंद्रातून कर्जमाफीचे पत्रक काढले. यादीत त्यांच्या नावासह अनेकांचे नाव दर्शविली आहेत. मात्र, त्यांना कर्जमाफी झालीच नाही.
कमलाबाई ठाकरे या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे. आधारवरील आकडे टाकून स्वस्त धान्य दुकानात थम्ब लागतो, तर तेच आकडे टाकून कर्जमाफीकरिता थम्ब का लागत नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे. स्टेट बँक व्यवस्थापनाने नव्याने आधार कार्ड अपडेट करूनही कर्जमाफीकरिता थम्ब लागत नसल्याने रोगाचे मूळ नेमके कोठे आहे, यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडे अनेकदा विचारणा करूनही लाभ मिळाला नाही. त्यामुळे आता ठाकरे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री, सहकार मंत्री, जिल्हा निबंधक व सर्व संबंधित खात्याकडे त्यांनी निवेदन पाठविले आहे.