यवतमाळ : येथील तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयातील लाचखोरी सर्वश्रुत आहे. येथील पुरवठा निरीक्षकाला एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. गेल्या काही वर्षांपासून या लाचखोर महिला अधिकाऱ्याच्या कारनाम्याची चर्चा वर्तुळात सुरू होती. रेशनचा काळाबाजार करणारे अनेक जण या अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. अखेर परवानाधारक रेशन दुकानदाराच्या मुलाने एसीबीकडे तक्रार केली आणि लाचखोर अधिकारी गजाआड झाली.
चांदणी शेषराव शिवरकर (३२) असे या लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. तिने वाईरुई येथील तक्रारदाराला २० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी दहा हजार रुपये लाच पहिलेच स्वीकारली होती. उर्वरित दहा हजारांची रक्कम तिने अमरावती एसीबीच्या पथकाने लावलेल्या सापळ्यासमोरच स्वीकारली.
यवतमाळ तहसील कार्यालयातील रेशन कार्ड विभागात पैसे देताना चांदणी शिवरकर हिला अटक करण्यात आली. तिच्याकडून लाचेस्वरूपात स्वीकारलेली दहा हजारांची रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात एसीबीने तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अमरावती येथील पोलिस निरीक्षक अमाेल कडू, योगेश दंदे, शिपाई विनोद पुंजाम, महिला शिपाई चित्रलेखा वानखडे, शैलेश कडू, गोवर्धन नाईक यांनी केली.
अमरावती एसीबीने महिन्याभरात यवतमाळ तहसील परिसरात दुसरा अधिकारी लाच घेताना टिपला आहे. यापूर्वी तालुका भूमिअभिलेख उपअधीक्षक विजय राठोड याला कक्षातच लाच घेताना रंगेहाथ अटक केली. यामुळे आता तहसील कार्यालयातील लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी चांदणी शिवरकर ही मागील काही महिने प्रसूती रजेवर होती. ती काही दिवसांपूर्वीच रुजू झाली होती. त्यातच रास्त भाव धान्य दुकानाच्या प्राधिकार पत्रावर वारस म्हणून नाव नोंद करण्यासाठी तिने पैशाची मागणी केली आणि एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकली.
कळंब येथे तलाठ्यावर लाच मागितल्याचा गुन्हा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यवतमाळ येथील पथकाने कळंब तालुक्यातील तलाठ्याविरोधात प्राप्त तक्रारीवरून सापळा लावला. या तलाठ्याने सात-बारातील मयत व्यक्तीचे नाव काढण्यासाठी चार हजारांची लाच मागितली. हा प्रकार २७ एप्रिल रोजी कळंब तहसीलमधील तलाठी कार्यालयात घडला.
या व्यवहारावरून आरोपी तलाठी प्रकाश ज्ञानेश्वर तिरळे (५०) नेमणूक सोनेगाव, ता. कळंब यांनी लाचेची रक्कम संकेत दादूसिंग गोलाईत या खासगी इसमाकडे देण्यास सांगितले. बुधवार २४ मे रोजी संकेत गोलाईत तलाठी कार्यालयात पैसे स्वीकारण्यास तयार झाला. मात्र, संशय येताच तलाठी प्रकाश तिरळे व संकेत गोलाईत हे दोघेही तेथून पसार झाले. त्यामुळे यवतमाळ एसीबीच्या पथकाने या प्रकरणात लाच मागितल्याची तक्रार तलाठी प्रकाश तिरळे व खासगी इसम संकेत गोलाईत या दोघांविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात दाखल केली. ही कारवाई उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ एसीबीच्या पथकाने केली.
n यवतमाळ एसीबीचा सलग दुसरा ट्रॅप फसला. एसीबी पथकाने नागपूर येथील चेक पोस्टवर आरटीओतील मोटार वाहन निरीक्षकावर ट्रॅप लावला होता. मात्र, तेथेही वेळेवर संशय आल्याने अधिकारी व त्याचा खासगी व्यक्ती पसार झाला. त्यानंतर आता कळंबमध्येही तशीच पुनरावृत्ती झाली आहे. यवतमाळ एसीबीचे सलग दोन ट्रॅप फसले. या दोन्ही प्रकरणांत लाच मागितल्याची तक्रार नोंदविली आहे.
पुरवठा विभागाला लाचखोरीचे ग्रहण
जिल्हा मुख्यालय असूनही गरिबांच्या धान्याचा सर्वाधिक काळाबाजार येथून केला जातो. आतापर्यंत पुरवठा विभागातील दोन निरीक्षण अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. राजरोसपणे दोन्ही अधिकारी पैशाचे व्यवहार कार्यालयातूनच करत होते. त्यांचा जाच असह्य झाल्याने रास्त भाव धान्य दुकानदारांनीच तक्रार देऊन या अधिकाऱ्यांचा हिशेब चुकता केला.