यवतमाळ : येथील धामणगाव बायपासवर नगर परिषद डम्पिंग यार्ड परिसरात गळा चिरलेल्या अवस्थेत शनिवारी रात्री महिला आढळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारीही तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी ती जबाब देण्यास अनफिट असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे या प्रकरणात कुणावरही गुन्हा नोंद करता आला नाही. प्रेमाच्या त्रिकोणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस वर्तवीत आहे.
मोहा येथे भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेवर कटरने वार करण्यात आले. गळा चिरल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यामुळे ती महिला बेशुद्ध होऊन जागेवर कोसळली. मारेकऱ्याला ती मेली असावी याची खात्री झाली व तो तेथून निघून गेला. रस्त्यावरून जाणाऱ्या सुज्ञ नागरिकाने रक्ताच्या थारोळ्यात महिला पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. नेमका काय प्रकार आहे, याचा शोध पोलिसांनी सुरू केला. प्रेमाच्या त्रिकाेणातून ही घटना घडली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.
पहिल्या प्रियकराने या महिलेला एकांतात नेऊन हे कृत्य केले. त्या संशयित प्रियकराला शहर पोलिसांनी नेताजी नगर परिसरातून ताब्यात घेतले आहे. हा प्रियकर विवाहित असून तो नेताजीनगरमध्ये वास्तव्याला आहे. त्याचे जखमी महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर त्याने महिलेला वेळ देणे बंद केले. दरम्यानच्या काळात या महिलेने एका कचोरी व्यावसायिकासोबत संबंध जुळविले. यातूनच चिडलेल्या जुन्या प्रियकराने दारूच्या नशेत महिलेचा गळा चिरला, अशी माहिती सांगण्यात येत आहे. भररस्त्यावर हा गंभीर प्रकार घडल्याने धामणगाव मार्गावरील वसाहतींमध्ये दहशत पसरली आहे.
नातेवाईकांनी तक्रार केल्यास अटकेची कारवाई
मात्र, महिला गंभीर असल्याने तिचा जबाब नोंदविण्यात आला नाही. त्यामुळे संशयिताला पकडूनही चौकशीव्यतिरिक्त कुठलीही कारवाई करता आली नाही. महिलेच्या नातेवाइकांकडून तक्रार आल्यास अटकेची कारवाई केली जाईल, असे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.