लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध मराठी चित्रपट आणि मराठी दूरचित्रवाहिनी मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या तेजश्री प्रधान या मराठमोळ्या अभिनेत्रीने मंगळवारी सखी मंच सदस्यांची मने जिंकली. निमित्त होते ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवाॅर्ड’ आणि ‘काॅफी टेबल बुक’ प्रकाशन सोहळ्याचे. या कार्यक्रमात तेजश्री प्रधान हिने थेट महिलांशी संवाद साधला. आज यवतमाळमध्ये येऊन खऱ्या आयुष्यातल्या हिरोंना मी भेटते आहे. हा कार्यक्रम माझ्यासाठीही प्रेरणादायी आहे. तुमचे प्रामाणिक कष्ट, कर्तृत्वाचा हा गाैरव असून या पुरस्काराच्या माध्यमातून ‘लोकमत’ने तुम्हाला त्याची पोचपावती दिल्याचे तेजश्री म्हणाली.दुपारच्या रणरणत्या उन्हातही मंगळवारी दर्डा मातोश्री सभागृह सखींच्या उपस्थितीने तुडुंब भरले होते. सगळ्यांना उत्सुकता होती ती तेजश्री प्रधान हिच्या भाषणाची. तेजश्रीने माईक हातात घेतला आणि सखींनी टाळ्यांचा कडकडाट केला. अगदी लहान वयात प्रत्येकाला जे चांगले पाहिले ते व्हावे असे वाटते. मात्र, वयाबरोबर स्वप्ने बदलत जातात. आपण आयुष्यात प्रत्येक वेळी शिकत असतो. दहा दगडांवर पाय ठेवत पुढे जात असतो. त्यातीलच एका दगडावर पाय ठेवून आपण स्थिरावतो. माझीही वाटचाल अशीच आहे. मी अभिनयाच्या क्षेत्रात उभी राहिले. ‘लेक लाडकी ह्या घरची’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर ‘होणार सून मी ह्या घरची’ या सुपरहिट मालिकेमुळे माझी जान्हवीची भूमिका घराघरात पोहोचली. त्यानंतर आलेल्या अग्ग बाई सासूबाईने मला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिल्याचे तेजश्री म्हणाली. मात्र, जान्हवी आयुष्यभर पुरणार नाही, याची मला जाणीव आहे. आपण कायम मेहनत करीत कार्यरत राहिले पाहिजे. असा माझा कायम प्रयत्न असतो. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, लोकमतचे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा, माजी नगराध्यक्ष कांचनताई चाैधरी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदाताई पवार आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी, लोकमत सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी लोकमत सखी मंच उपक्रमाचे काैतुक केले. विविध क्षेत्रांतील महिलांना सखी मंचने अनेक संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत, सखी मंचचे सदस्य होऊन यापुढेही आपण आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे, आपला उत्कर्ष करून घ्यावा, असे त्या म्हणाल्या. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी केले. काॅफी टेबल बुक आणि वुमन अचिव्हर्स अवाॅर्ड मागील लोकमतची भूमिका त्यांनी प्रास्ताविकातून विशद केली. शेवटी लोकमत अमरावती युनिटचे संपादकीय प्रमुख गजानन चोपडे यांनी आभार मानले. सखींनो इथेच थांबू नका, आयुष्याचे उद्दिष्ट गाठाविविध पुरस्कार, सन्मान चिन्हांसाठी अनेक जण घरामध्ये वाॅल उभारतात. मीही माझ्या घरात अशीच एक वाॅल तयार केली आहे. मात्र, लाइटची व्यवस्था असलेल्या या वाॅलमधील एक चाैकोन मी नेहमीसाठी रिकामा ठेवला आहे. पुढेही त्या चाैकोनात मी काही ठेवणार नाही. प्रत्येक अवाॅर्ड हा त्या क्षणाचा असतो. केवळ एखाद्या अवाॅर्डवर पुढचे दिवस आपण काढू शकत नाही. याची जाणीव मलाही रिकामी वाॅल पाहिल्यानंतर होते आणि पुन्हा नव्या उमेदीने मी कामाला लागते. सखींनो आज तुमचा सन्मान तुम्ही करीत असलेल्या कामामुळे झालेला आहे. त्यामुळे इथेच थांबू नका, आयुष्यात अनेक गोष्टी करण्यासारख्या असतात. प्रामाणिकपणे प्रयत्न करा, ठरविलेल्या उद्दिष्टापर्यंत आपण निश्चित पोहोचू, अशा शब्दात तेजश्री प्रधान हिने सखींना काम करीत राहण्याची प्रेरणा दिली.
या कर्तबगार महिलांचा झाला सन्मानअनघा नरेंद्र गद्रे, अंजली महेश नालमवार, अपूर्वा अरुण सोनार, अरुणाताई खंडाळकर, अस्मिता वैद्य, भावना अजय शेटे, चारुलता पावशेकर, छाया भारत राठोड, प्रा.डॉ. आशाताई देशमुख, डॉ. रश्मी बंग, कालिंदाताई यशवंतराव पवार, कांचनताई बाळासाहेब चौधरी, कविता सुभाषचंद्र भोयर, माधुरीताई आसेगावकर, मनीषा आकरे, मृणाल डगवार (बिहाडे), नयना शैलेश ठाकूर, प्रीतीताई धामणकर, प्रियंका तुषार परळीकर, राखी रितेश पुरोहित, रत्नप्रभादेवी गोवर्धनदासजी सोनी, सदफजहां मुहम्मद जावेद, संध्याताई राजेश पोटे, संध्याताई सव्वालाखे, सरोज भंडारी, सविता सुरेश रेड्डी, शीतल रवी पोटे, शोभना सुभाष काशेटवार, सुनीता पवन जयस्वाल, प्रा. डॉ. स्वाती वाठ, वैशाली संजय देशमुख, वंदना बिपीन चिद्दरवार, वनमालाताई राठोड, वर्षा माधव वैद्य या कर्तबगार महिलांचा ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवाॅर्ड २०२१’ देऊन गाैरव करण्यात आला.