यवतमाळ : सहा नगर पंचायतींपैकी महागाव, बाभूळगाव आणि कळंबच्या अध्यक्षपदी आता महिला विराजमान होणार आहेत. मारेगाव आणि झरीजामणी नगर पंचायत अध्यक्षपद सर्वसाधारण झाले असून, राळेगाव नगर पंचायतीचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे.
गुरुवारी मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. महागाव नगर पंचायतीचे अध्यक्षपद यापूर्वी अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होते. येथे आता हे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी असणार आहे. मारेगाव नगर पंचायतीत पूर्वी अनुसूचित जमाती महिलेचे अध्यक्षपदासाठी आरक्षण होते. आता मारेगावचे अध्यक्षपद खुले झाले आहे.
राळेगाव नगर पंचायतीचे अध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी होते, आता ते अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. तर बाभूळगाव नगर पंचायतीचे अध्यक्षपद पूर्वी खुले होते, ते आता अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे. कळंब नगर पंचायतीचे अध्यक्षपद पूर्वी ओबीसी महिलेसाठी आरक्षित होते. हे अध्यक्षपद आता महिलांसाठी खुले झाले आहे. तर झरी जामणीचे अध्यक्षपद पूर्वीही खुले होते, आताही ते खुले राहणार असल्याचे गुरुवारी आरक्षण सोडतीतून स्पष्ट झाले.
दरम्यान, राळेगावमध्ये नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीची महिला बसणार, हे आता स्पष्ट झाले आहे. येथे काॅंग्रेसने सर्वाधिक ११ जागा जिंकल्या आहेत. कळंबमध्येही महाविकास आघाडीचाच प्रयोग होऊ घातला आहे. येथे काॅंग्रेसने सर्वाधिक सात तर शिवसेनेने तीन जागा जिंकल्या आहेत. अनुसूचित जमाती महिलेसाठी बाभूळगावचे अध्यक्षपद जाणार आहे. येथे शिवसेनेने सर्वाधिक सहा तर काॅंग्रेसने चार जागा जिंकल्या आहेत. मारेगावमध्येही काॅंग्रेसकडे पाच तर शिवसेनेकडे चार सदस्य असून, झरीजामणीत सत्तेसाठी रस्सीखेच होऊ शकते.
सहा नगर पंचायतींमध्ये काॅंग्रेस, शिवसेनेचा बोलबाला
सहा नगर पंचायतींमधील १०२ जागांपैकी सर्वाधिक ३९ जागा काॅंग्रेसने जिंकलेल्या आहेत तर २५ जागा जिंकत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी भाजपला १३ जागा मिळाल्या आहेत तर राष्ट्रवादीकडे चार सदस्य आहेत. पक्षीय बलाबल पाहता, जिल्ह्यातील सर्व सहाही नगर पंचायतींमध्ये महाविकास आघाडी वरचढ ठरत आहे.