लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील डोर्लीपुरा परिसर हा प्रभाग क्र. २ व प्रभाग क्र. ८ मध्ये येतो. येथे २५ एप्रिल रोजी कोरोनााच पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा परिसर प्रशासनाने खबरदारी म्हणून सील केला. आतापर्यंत या भागात कुठलीच मदत पोहोचली नाही. त्यामुळे अडचणी असलेल्या महिलांनी शनिवारी रस्त्यावर उतरत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महिलांचा मोठा जथ्था जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला असता त्यांना रस्त्यातच अडविण्यात आले.डोर्लीपुरा या भागात संपूर्ण कुटुंब रोजमजुरी करून पोट भरणारे आहे. परिसर सील केल्यामुळे येथील नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. झोपडी वजा घरात राहणारे कुटुंब असल्याने घरात अन्न धान्याचा साठाही नाही. त्यातच एक महिन्यापासून घरीच अडकून पडले आहे. काहींनी जवळचा पैसा, दागदागिने मोडून आतापर्यंत पोट भरले. शासनाची मदत येथील गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचलीच नाही. ही मदत कुठे गेली याचा शोध घ्यावा, अशी मागणी या महिलांनी केली. शेकडो महिला शनिवारी सकाळी १०.३० वाजता घराबाहेर पडल्यानंतर त्यांना महात्मा फुले चौकात थांबविण्यात आले. परिस्थिती पाहून पोलिसांनी तहसीलदार कुणाल झाल्टे यांना घटनेची माहिती दिली. तहसीलदारांनी तात्काळ घटनास्थळ गाठून या महिलांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांना मदत देण्यासाठी नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे या महिला परत घरी निघून गेल्या. मात्र या महिलांमध्ये प्रशासनाप्रती व मदत वाटप करणाऱ्या यंत्रणेबाबत प्रचंड रोष होता. भेदभाव केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. स्थानिक पातळीवर मनमानी निकष लावून डावलले जात असल्याचेही या महिलांनी आपल्या तक्रारीत नमूद केले.यावेळी गंगाधर खंडारे, विनोद वाघदरे, विक्की वाघदरे, मयूर वाघदरे, गोविंदा मराठे, शत्रुघ्न मडावी, किशोर नागपुरे, ज्ञानेश्वर नागपुरे, कविता चौधरी, बेबी राठोड, लीलाबाई मेश्राम, देवकाबाई वाघदरे, सुनीता वाघदरे, सावित्री खंंदारे, विठाबाई वाघदरे आदी उपस्थित होते.१५ हजार लोकसंख्येला मदत तोकडीडोर्लीपुरा व परिसर शासनाने सील केला. एक महिन्याचा कालावधी झाला आहे. या भागात शासनाकडून, समाजसेवी संस्था व दानदात्यांच्या माध्यमातून मदत वाटपाची काम सुरू आहे. मात्र १५ हजार लोकसंख्या असलेल्या या भागात प्रत्येक घरी मदत पोहोचविणे शक्य नाही. ही मदत तोकडी पडणारी आहे. नगरसेवक म्हणून मदत वाटपाचा उपक्रम राबविला. शासनाकडे गरजू कुटुंबांची यादी दिली आहे. मात्र त्यावर अजूनही काहीच झाले नाही. प्रत्येकालाच सहकार्य करण्याची गरज असल्याचे नगरसेविका पल्लवी रामटेके यांनी सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी या भागात भेट दिली.
जीवनावश्यक वस्तूसाठी महिला उतरल्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:00 AM
डोर्लीपुरा या भागात संपूर्ण कुटुंब रोजमजुरी करून पोट भरणारे आहे. परिसर सील केल्यामुळे येथील नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. झोपडी वजा घरात राहणारे कुटुंब असल्याने घरात अन्न धान्याचा साठाही नाही. त्यातच एक महिन्यापासून घरीच अडकून पडले आहे. काहींनी जवळचा पैसा, दागदागिने मोडून आतापर्यंत पोट भरले. शासनाची मदत येथील गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचलीच नाही.
ठळक मुद्देडोर्लीपुरा येथे झाला अखेर उद्रेक, परिसर सील केल्यापासून मदतच मिळाली नसल्याची ओरड