लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिला अक्षम अजिबात नाहीत. पण त्या स्वत:ला अक्षम समजतात. बुरसटलेली मानसिकता सोडून दिल्याशिवाय आपल्याला आपल्या सक्षमतेचा परिचय होणार नाही, असे प्रतिपादन माळी समाजातील पहिल्या आयएएस तथा गृहविभागाच्या उपसचिव भाग्यश्री बानाईत यांनी केले.अखिल भारतीय माळी महासंघातर्फे आयोजित पहिल्या महिला अधिवेशनाच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, नोकरी करून घर सांभाळणारी ‘सुपर मॉम’ही एखाद्या दिवशी चुकली तरी तिला दोष दिला जातो. अशावेळी जुनी गुलामगिरीची मानसिकता आपल्याला जखडून ठेवते. अमेरिकेत महिलांना रात्रीही फिरण्यासाठी मुभा आहे. तेवढी सुरक्षितता भारतात का नाही? तू रात्री बाहेर जाऊ नको, असे महिलांनाच का सांगितले जाते? ही बंदी पुरुषांना का नाही? इज्जत काय फक्त महिलांनाच असते? पुरुषांना नाही? आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करतो, कमावतो. मग हा भेदभाव का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.‘फुले-सावित्रीच्या विचारातून महिलांचे सक्षमीकरण’ या विषयावर बोलताना प्रमुख वक्त्या वैशाली डोळस म्हणाल्या, पौष महिन्यात गुरुवारच्या गुरुवारी पारायणे करण्यात महिला व्यस्त असतात. त्याऐवजी महिलांनी महात्मा फुलेंचे ग्रंथ वाचले पाहिजे. टीव्ही मालिकांमधून व्रतवैकल्याचेच स्तोम माजविले जात आहे. ते आम्ही टाळले पाहिजे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला गुलामगिरी झुगारण्याची शिकवण दिली. मात्र, आम्ही मकरसंक्रांतीतून आजही गुलामांची फौज निर्माण करीत असतो. मनुस्मृति म्हणते, महिलांनी तुळशीला पाणी घातले पाहिजे, म्हणजे तेवढेच तिला घराबाहेर पडून सूर्यप्रकाश मिळविता येईल. पण का? स्त्रिने बाराही तास घराबाहेर राहिल्यास हरकत काय? आम्ही तसे केले नाही. कारण सनातन ब्राह्मणवादाची आम्हाला भीती होती. आजही महिलांचा छळ करणारे बुवाबापू आहेत. आम्ही अशा बाबांचा साधा निषेधही करायला बाहेर पडत नाही. स्वत:ला सावित्रीच्या लेकी म्हणवून घ्यायचे असेल तर सावित्रीबार्इंचे विचार आचरणात आणले पाहिजे. हिंदू धर्म आम्हाला महिन्यातले चार दिवस अशुद्ध ठरवितो. मूर्तीला हातही लावू देत नाही आणि आम्ही म्हणतो हा आमचा धर्म. असा ‘डबल क्लेम’ आपल्याला करता येणार नाही. एकतर सुधारणेचे विचार स्वीकारावे लागतील किंवा जुन्या चालीरितींचे जोखड स्वीकारावे लागेल. सावित्री स्वीकारायची असेल तर गुलामगिरी सोडावीच लागेल. महालक्ष्म्या का बसवायच्या हेच अनेकांना माहिती नसताना दरवर्षी बसविल्या जातात. पण घरातल्या महालक्ष्मीला मात्र ओळखले जात नाही. बहुजनांच्या मुलांनी-मुलींनी शिकले पाहिजे म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्या. म्हणून आपण सत्यनारायणावर खर्च करण्यापेक्षा मुलींच्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे.प्रास्ताविक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना उडाखे यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी केवटे यांनी केले. या अधिवेशनाला राज्य कार्यकारिणीच्या अॅड. प्रतिभा निखाडे, वर्धा जिल्हाध्यक्ष रोहिणी पाटील, गोंदिया जिल्हाध्यक्ष गायत्री इरले, भंडारा जिल्हाध्यक्ष माधुरी देशकरी, बुलडाणा जिल्हाध्यक्ष वनिता बोराडे, सुरेखा सातव, नागपूर अध्यक्ष वसुधा येनकर, अकोला जिल्हाध्यक्ष भारती शेंडे, अमरावती जिल्हाध्यक्ष वर्षा भुसारी, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रागिणी मोहुर्ले, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष छाया सोनुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महिलांनो, तुम्ही सक्षमच आहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:00 PM
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिला अक्षम अजिबात नाहीत. पण त्या स्वत:ला अक्षम समजतात. बुरसटलेली मानसिकता सोडून दिल्याशिवाय आपल्याला आपल्या सक्षमतेचा परिचय होणार नाही, असे प्रतिपादन माळी समाजातील पहिल्या आयएएस तथा गृहविभागाच्या उपसचिव भाग्यश्री बानाईत यांनी केले.अखिल भारतीय माळी महासंघातर्फे आयोजित पहिल्या महिला अधिवेशनाच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ...
ठळक मुद्देभाग्यश्री बानाईत : माळी महासंघातर्फे पहिले महिला अधिवेशन, विविध विषयांवर मार्गदर्शन