घाटंजी : सततचे भारनियमन, वीज पुरवठा खंडीत होणे, तीन-तीन दिवस अंधारात दिवस काढावे लागणे, वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्यांकडून उर्मट वागणूक मिळणे या सर्व बाबींना कंटाळून सोमवारी येळाबारा येथील महिलांनी वीज वितरणच्या कार्यालयावर धडक देऊन सहायक अभियंता प्रशांत अंबाडकर यांना घेराव घातला. येळाबारा येथील नागरिक तब्बल तीन दिवस अंधारात होते. भारनियमनाव्यतिरिक्त वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. तेंव्हा हा त्रास चार दिवसात बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला .परंतु वीज वितरण कंपनीकडून आपल्या कामात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. ग्रामीण जनता वीज बिल भरत नाही का, असा सवाल या महिलांनी केला. येळाबारा येथे वीज कंपनीचा लाईनमनच नाही. एखाद्याच्या घरची लाईन खांबावरून कार्बन चढल्यामुळे बंद झाल्यास ती सुरू करण्यासाठी लाईनमन शंभर रुपयांची मागणी करतात, आदी व्यथा महिलांनी यावेळी मांडल्या. यावेळी अंबाडकर यांनी कनिष्ठ अभियंता खर्चे यांना बोलावून वीद्युत पुरवठय़ाचे काम चार दिवसात करून देण्याचे आश्वासन दिले. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांनी २0११ साली येळाबारा फिडरच्या गावठानचे काम नागार्जूना कंपनीला दिले होते. या कंपनीने हे काम आजपर्यंत पूर्ण केले नाही. सदर काम या कंपनीकडून काढून घेऊन दुसर्या कंपनीला द्यावे व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी येळाबारा येथील महिलांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
महिलांची वीज वितरण कार्यालयावर धडक
By admin | Published: June 09, 2014 11:51 PM