पुसद : तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सावरगाव (बंगला) येथे अवैध देशी दारू, जुगार, मटक्याने कहर केला. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महिलांनी एल्गार पुकारून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
सावरगाव येथील दारू, मटका, जुगार त्वरित बंद करण्याची मागणी महिलांनी केली. त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात वारंवार निवेदन दिले. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे आता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. गावात सर्रास दारू, गुटखा, मटका, जुगार सुरू असल्यामुळे महिलांना त्रास होत आहे. कुटुंबातीलच व्यक्ती या धंद्यामागे लागल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
ग्रामपंचायतीला अवैध धंदे बंद करण्यासाठी ठराव घेण्याससुद्धा महिलांनी भाग पाडले होते; परंतु अद्याप कोणतेच अवैध धंदे बंद झाले नाहीत. त्यामुळे महिलांनी शेतमजुरीची कामे सोडून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडक दिली. निवेदन देताना नंदा राठोड, वंदना कांबळे, संगीता चव्हाण, सुमन राठोड, शारदा राठोड, वनिता बरडे, छाया कांबळे, कमल मनवर, प्रमिला मनवर, जयश्री मनवर, शांता मनवर, आम्रपाली मनवर, मंगला मनवर, माया बलखंडे, कमल बलखंडे, लक्ष्मी रणखांब, शारदा आटपाटकर आदी उपस्थित होत्या.
बॉक्स
अन्यथा धरणे, रास्ता रोको आंदोलन
सावरगाव येथील अवैध धंदे त्वरित बंद न झाल्यास महिलांनी धरणे, रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला. आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे, असे आर्जवही महिलांनी केले. याबाबत खंडाळा पोलीस ठाण्यातही निवेदन दिले आहे.