लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रस्थानी आहे. बचतगटाच्या माध्यमातून गाव पातळीवर एक चळवळ तयार होत आहे. महिलांच्या कार्यक्षमतेने राष्ट्र विकासाला हातभार लागणार आहे. यातून गावांचा विकास घडेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले.समृद्धी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. गत पाच दिवसांपासून येथील समता मैदानात महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना माधुरी आडे म्हणाल्या, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती जर मजबूत करायची असेल, तर जोडधंदा महत्त्वाचा आहे. त्यामुळे बचतगटांची चळवळ प्रेरणा देणारी ठरणार आहे. यापेक्षाही महिलांनी उत्तम कामगिरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, नेरच्या सभापती मनीषा गोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. दीपक सिंगला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, समन्वयिका सविता राऊत उपस्थित होत्या.डॉ. दीपक सिंगला म्हणाले, महिलांनी पुढे यावे, प्रशासन त्यांच्या मदतीसाठी तयार आहे. गरिबी संपवायची असेल, तर कुणाची वाट बघू नका. स्वत:च पुढाकार घेऊन कामाला लागा. विकास आपोआप घडेल, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात प्रत्येक बचत गटाला प्रशस्तीपत्र देण्यात आले. उत्तम कामगिरी करणाऱ्या आणि सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या गटांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यात घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धाच्या आदर्श आदिवासी महिला बचतगटाला प्रथम क्रमांक मिळाला. या गटाने मध विक्रीकरिता आणले होते. इंजाळा येथील जिजाऊ स्वयंसहायता बचतगटाने सोयाबीनपासून तयार केलेल्या वस्तू विक्रीस आणल्या होत्या. या गटाला दुसरा क्रमांक मिळाला. बोरीअरबच्या अन्नपूर्णा महिला बचतगटाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. संचालन साधना दुबे यांनी केले.रोपवाटिकेने वेधले लक्षप्रदर्शनात विविध प्रकाराचे पुष्प, वनऔषधी आणि विविध वृक्षांच्या रोपवाटिकेचा समावेश होता. रोपवाटिका आणि पुष्पांचा समावेश असलेल्या स्टॉलने प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. दारव्हा तालुक्यातील कामठवाडा येथील या बचतगटाने वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.
महिलांच्या कार्यामुळे विकासाला हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 9:55 PM
आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रस्थानी आहे. बचतगटाच्या माध्यमातून गाव पातळीवर एक चळवळ तयार होत आहे. महिलांच्या कार्यक्षमतेने राष्ट्र विकासाला हातभार लागणार आहे.
ठळक मुद्देमाधुरी आडे : चिखलवर्धा, इंजाळा, बोरीच्या गटांची बाजी