तरुणाची फसवणूक : ‘चेहरा ओळखा, लाखो जिंका’चा फंडाआर्णी : दूरचित्रवाहिनीवरील ‘चेहरा ओळखा’ कार्यक्रमातून एका तरुणाला बक्षीसाच्या नावावर लाकडी भुसा पार्सलमधून आल्याची घटना आर्णी तालुक्यातील देऊरवाडी बुटले येथे उघडकीस आली. या तरुणाची तीन हजार रुपयांनी फसवणूक झाली. तालुक्यातील देऊरवाडी बुटले येथील गजानन इंगळे या तरुणाने ‘चेहरा ओळखा, लाखो कमवा’ हा दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम पाहून फोन केला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधून तुम्हाला सफारी गाडी लागल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी काही रक्कम भरण्याचे सांगण्यात आले. परंतु आपल्याला सफारी गाडी कशी लागले, असे म्हणून त्याने पैसे भरण्यास नकार दिला. हा प्रकार तो विसरलाही होता. परंतु पुन्हा महिनाभराने त्याला फोन आला. आपल्याला मोबाईल आणि दहा ग्रॅम सोन्याची चेन बक्षीस म्हणून लागली आहे. सदर पार्सल प्राप्त झाल्यानंतर तीन हजार रुपये द्यायचे आहे, असे सांगितले. यात गजानन फसला. त्याने सदर भामट्यांना होकार दिला. काही दिवसात त्याच्या घरी पार्सल आले. पोस्टात तीन हजार ५० रुपये भरुन पार्सल सोडविले. आनंदात घरी आला. पार्सल फोडल्यानंतर त्यात लाकडी भुसा पाहून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आपण अधिक लालचेत पडलो असतो तर मोठ्या रकमेने फसविल्या गेलो असतो. थोड्याच पैशात निभावली, असे म्हणत त्याने आपली कैफियत मांडली. बक्षीसांचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार घडत आहे. (शहर प्रतिनिधी)
पार्सलमध्ये आला लाकडी भुसा
By admin | Published: November 13, 2015 2:21 AM