लोकमत न्यूज नेटवर्क वटफळी : येथील संत शिवाजी महाराज मंदिर आणि काही शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम रखडल्याने पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होणार आहेत. याविषयी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधितांकडे विचारणा केली असता उद्धट उत्तर देण्यात आले. गावामधून मंदिराकडे जाणारे भाविक तसेच सदर भागात शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या रस्त्यावरून दोन मोठे नाले वाहतात. या नाल्याच्या संगमावर असलेला जुना पूल तोडून नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले. मात्र मागील तीन महिन्यांपासून काम थांबलेले आहे. पावसाळ्यात या नाल्याला मोठा पूर येतो. अशावेळी शेतात जाण्याचा आणि परत येण्याचा प्रश्न निर्माण होतो. शेतात जाण्याचा रस्ताच बंद झाल्यास शेतीची कामे करायची कशी हा प्रश्न निर्माण होणार आहे.
वटफळी येथील पुलाचे काम रखडले
By admin | Published: May 27, 2017 12:16 AM