शेतकऱ्यांचे निवेदन : जमीन गेली परंतु सिंचनाची सोय झाली नाही पुसद : जिल्हा परिषद सिंचन विभागाच्यावतीने बारा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या पाझर तलावाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. या पाझर तलावासाठी जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. मात्र अद्यापही सिंचनाची सोय झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत असून या तलावाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. फूलवाडी-लोहरा येथे २००४-०५ मध्ये पाणशिरा पाझर तलाव मंजूर करण्यात आला होता. जलक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने हा तलाव मंजूर झाला होता. तलावाच्या बुडित क्षेत्रात गेलेल्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून सातबारावरील जमिनी कमी करण्यात आल्या आहे. उर्वरित शेतजमिनीवर सिंचनाची सोय होणार होती. लोहरा, फूलवाडी, देवठाणा आणि जामवाडी येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार होते. तसेच माळपठार भागातील पाणीटंचाई कमी होणार होती. परंतु राजकीय दबावामुळे हा तलाव अद्यापही पूर्ण झाला नाही. प्रस्तावित कामाचे टेंडर निघून वर्कआॅर्डर झाली होती. परंतु सिंचन विभागाचे अधिकारीही सदर काम करू शकले नाही. आता या तलावाचे काम जलयुक्त शिवार योजनेतून करावे, अशी मागणी राजेंद्र चव्हाण, प्रकाश चव्हाण, माजी सरपंच राजू पवार, डॉ.प्रमोद चव्हाण, विनोद चव्हाण, खुशाल चव्हाण, शंकर राठोड, उद्धव राठोड यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी) पालकमंत्र्यांना निवेदन लोहरा, फुलवाडी व देवठाणा येथील शेतकऱ्यांनी या पाझर तलावाच्या कामासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आदींना निवेदन दिले असून तत्काळ काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पनशिरा पाझर तलावाचे काम बारा वर्षांपासून रखडले
By admin | Published: March 13, 2017 1:04 AM