संभाजी भिडे : शिव प्रतिष्ठानच्यावतीने व्याख्यानपुसद : शिवचरित्राचा आज उपयोग गटाच्या, पक्षाच्या स्वार्थासाठी केला जातो. सत्ता, पैसा आणि मोठेपणा मिरविण्यासाठी शिवरायांच्या नावांचा उपयोग होतो. पुतळे, फलक उभारणे, जयंती, पुण्यतिथी साजरी करणे अशा दिखावटी कामांसाठी शिवचरित्राचा वापर होतो. यावर समाजाने विचारमंथन करावे, शिवछत्रपतींचे अवतार कार्य दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन संभाजी भिडे गुरुजी यांनी येथे केले. शिव प्रतिष्ठान हिन्दुस्थानच्यावतीने येथील ज्योतिर्गमय शाळेच्या प्रांगणात रविवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. भिडे गुरुजी म्हणाले, शिव चरित्राबाबत अतिपरिचयात अवज्ञा अशी अवस्था आज समाजाची झाली आहे. पाण्यात राहणाऱ्या मासोळीला पाण्याचे महत्व कळत नाही. मलय पर्वतावर राहणाऱ्यांंना चंदनाचे महत्व कळत नाही. गंगातीरी राहणाऱ्यांंना गंगास्थान उमजत नाही, अशीच अवस्था आज समाजाची झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. धर्म संस्कृती समाज आणि राष्ट्र उभारणीत शिवरायांचे मोठे योगदान आहे. त्यांचे पिताश्री शहाजी राजे भोसले यांनी शिवरायांच्या आधीच स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात अपयश आले. त्यांचा तोच विचार शिवरायांनी पुढे नेला. स्वराज्याची स्थापना केली, असे ते म्हणाले. शिवाजी महाराजावाचून या देशाची कल्पना कोणीही करू शकत नाही. त्यांच्या त्यागाची आठवण ठेऊन त्यांचे चरित्र आचारणात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी मार्लेगाव येथील गजानन शिंदे यांनी शिवरायांविषयी भूमिका विशद केली. यावेळी आनंद येरावार, श्रीरंग सरनाईक, अमोल चांडक, नीलेश अग्रवाल, रवी ग्यानचंदाणी आदी उपस्थित होते. या व्याख्यानाला शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिडे गुरुजींनी केलेल्या मार्गदर्शनाने अनेकांचे प्रबोधन झाले. (प्रतिनिधी)
शिवछत्रपतींचे कार्य दीपस्तंभासारखे
By admin | Published: January 06, 2016 3:12 AM