उमरखेड : गत आठ महिन्यांपासून थकीत असलेल्या वेतनासाठी पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे. वसंत सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे गत आठ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. अनेकदा निवेदने देण्यात आली. आंदोलनेही करण्यात आली. परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर कामगार संघटनेच्यावतीने मोर्चा काढला. त्यावेळी कामगार आणि प्रशासनात बोलणी होवून वाटाघाटी झाली होती. त्यानंतरही वेतन मिळाले नाही. शेवटी ५ मार्च रोजी कामगारांनी काखान्यावर मोर्चा नेला.परंतु संचालक मंडळाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांनी गाळप थांबवून गेटसमोर ठिय्या दिला आहे. विशेष म्हणजे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३६ हजार टन ऊस उभा असून यामुळे शेतकरी धास्तावले आहे. दुसरीकडे कामगारांना पगार नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. किराणा, दवाखाना व मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी कामगारांजवळ पैसेच नाही. परंतु कारखाना प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. कारखान्याचे माजी अध्यक्ष तातू देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी कामगारांना समजावून सांगत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहे. कामगारांचे आठ महिन्यांचे वेतन, सेवानिवृत्त कामगारांचे पैसे त्याचबरोबर कायम व हंगामी कर्मचाऱ्यांचा फरक यासह विविध योजनेतील थकबाकी असे सुमारे दहा कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहे. परंतु कारखाना प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. दोन दिवसांपासून गाळप बंद असल्याने कारखान्यासमोर उसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टर उभे असून साखर प्रक्रिया थांबल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. (शहर प्रतिनिधी)
‘वसंत’मध्ये पुन्हा काम बंद
By admin | Published: March 08, 2015 2:07 AM