लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागासवर्गीयातील काही मोजक्या जणांची प्रगती झाली म्हणजे आरक्षणाची गरज संपली, असे नाही, तर आजही दलित आदिवासी समाजातील कोट्यवधी कुटुंबे हलाखीचे जीवन जगत असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. वीरबापूराव शेडमाके प्रबोधिनीच्या माध्यमातून आदिवासी समाजाला प्रगतिशील मार्गावर नेण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. शनिवारी तळेगाव येथे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांच्या पुढाकारातून उभारलेल्या वीर बापूराव शेडमाके प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, वसंतराव पुरके, संध्याताई सव्वालाखे, कीर्ती गांधी, वामनराव कासावार, आमदार वजाहत मिर्झा, मारोतराव कोवासे, विजय खडसे, आनंद गेडाम, नामदेव उसंडी, जीवन पाटील, प्रवीण देशमुख, प्रफुल्ल मानकर, भैयासाहेब देशमुख, देवानंद पवार, मनीष पाटील, अशोक बोबडे, अरुण राऊत, जितेंद्र मोघे, दशरथ मडावी, आनंद गेडाम, जावेद अन्सारी, राम देवसरकर, उत्तम गेडाम, विजय मोघे, जया पोटे, सुरेश चिंचोळकर, डाॅ. टी. सी. राठोड, वनमाला राठोड, उन्मेश पुरके, किरण मोघे, आदींची उपस्थिती होती. प्रारंभी पारंपरिक वाद्याच्या निनादात सुशीलकुमार शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील आदिवासी नेते समाजाचे विविध प्रश्न मांडत असतात. त्यांच्यामुळेच अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्णय घेताना मदत मिळायची, असे सांगत १९७० पर्यंत या वर्गाला नेतृत्व नव्हते, त्यानंतर मात्र इंदिरा गांधींनी विविध कायदे करीत त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता केवळ २०१४ नंतरच प्रगती झाल्याचा देखावा केला जात असल्याचे सांगत शिंदे यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी प्रबोधिनीच्या कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या. अरविंद वाढोणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर उत्तम गेडाम यांनी आभार मानले. यावेळी प्रबोधिनीच्या निर्मितीला हातभार लावणारे राहुल शिंदे, मिलिंद फुटाणे, प्रशांत कुसराम, दीपक कोरांगे, माधुरी मडावी, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, डाॅ. चंद्रशेखर कुडमेथे, संभाजी सरकुंडे, राम चव्हाण, अजय घोडाम, सुनील ढाले, एम. झेड. कुमरे, माधव सरकुंडे, महेश कोडापे यांचा सन्मान करण्यात आला.
न्यायासाठी सनदशीर मार्गाने प्रबोधिनी करणार प्रयत्न- माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी प्रास्ताविक केले. प्रबोधिनीच्या माध्यमातून वंचितांना शिक्षित करण्याचा तसेच सनदशीर मार्गाने न्यायासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, प्रबोधिनी सर्वांसाठी खुली असेल, बहुजन हितासाठी तसेच मानवी जीवनाशी निगडित विषयावर मार्गदर्शन करील, असे सांगितले. तर शिवाजीराव मोघे यांनी भाजप सरकारने बोगस आदिवासींना नियमित करण्याचा प्रयत्न केल्याची टीका केली. माणिकराव ठाकरे यांनीही भाजपवर टीका करीत लोकशाही उखडून फेकण्याचे भाजपाचे मनसुबे उधळून लावा, असे आवाहन केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्राने काळे कृषी कायदे परत घेतले. मात्र जनता भाजपाचा कावा ओळखते, असेही माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले.