मंगरूळ/हिवरी (यवतमाळ) : हॉटेलच्या बांधकामावर पाणी मारताना उच्चदाब वीज वाहिनीच्या तारांना स्पर्श होऊन हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास मंगरुळ (ता.यवतमाळ) येथे घडली. दत्ता थावरू राठोड (४०) रा. सालोड, असे मृताचे नाव आहे.मंगरुळ येथून ११ केव्ही वीज वाहिनी गेली.
या वाहिनीच्या खाली रमेश जाचक यांचे हॉटेल आहे. या हॉटेलचे बांधकाम केले जात आहे. जाचक यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये नोकर असलेल्या दत्ता राठोड यांना बांधकामावर पाणी मारण्यासाठी पाठविण्यात आले. वीज तारांना स्पर्श झाल्याने तो खाली कोसळला. लगेच त्याला पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गिरपुंजे व नागरिकांनी यवतमाळ येथे हलविले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या मागे वडील, पत्नी व आप्त परिवार आहे.
११ केव्ही वीज वाहिनी गावाबाहेरून नेण्यासाठी मंगरुळ येथील नागरिकांचा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले. परंतु, विद्युत कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. या वीज वाहिनीखाली अनेक घरे आहेत. वीज तारांमधील घर्षणाने ठिणग्या घरावर पडतात. या प्रकारात मोठी घटना होण्याची भीती आहे. वीज कंपनीच्या दुर्लक्षित धोरणाचा दत्ता राठोड हा बळी ठरल्याचा आरोप होत आहे. आतातरी वीज कंपनीने ही वीज वाहिनी गावाबाहेरून न्यावी, अशी मागणी केली जात आहे.