यवतमाळ :यवतमाळ येथे युथ फेस्टिव्हल अंतर्गत पहिल्यांदाच सुपर कार व सुपर बाईक शो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रदर्शनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुपर कार तसेच बाईक पाहण्याची संधी यवतमाळातील तरुणाईला लाभणार आहे.
विविध चित्रपट व मोठ्या शहरात स्पोर्टस् सुपर बाईक तसेच स्पोर्टस् कार दाखविल्या जातात. या गाड्या थेट पाहण्याची संधी सोहम संजय राठोड यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे. राठोड यांनी मुंबईतील नामवंत सुपर कार व सुपर बाईक मालकांना यवतमाळ येथे येण्याची विनंती केली. त्यानुसार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत पोस्टल ग्राऊंड (समता मैदान) येथे या कार यवतमाळकरांना पाहता येणार आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी हेमंत भिसे यांच्या संचाच्या लाईव्ह ऑर्केस्टाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने यवतमाळ शहरातील व्हिन्टेज बाईक व कारसुद्धा प्रदर्शन स्थळी ठेवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला मिस्टर ऑलम्पिया सिल्व्हर मेडलिस्ट मिस्टर आशिया व मिस्टर इंडिया सुहास खामकर तसेच लाखो फॅन फॉलव्हिंग असलेले जोनाथ गेमिंग, क्रॉटन गेमिंग व श्रीमान लिजेंड यांची विशेष उपस्थिती राहणार असून, उपस्थित तरुणांशी ते संवाद साधणार आहेत. या शो व प्रदर्शनीमध्ये तरुणांसाठी खास क्वीज स्पर्धा आयोजित केली असून, विजेत्यांना बक्षिसांसोबतच सुपर बाईकसोबत फोटो काढण्याची संधी मिळणार आहे.
या दुर्मीळ गाड्या राहणार प्रदर्शनात
फेरारीसह पोर्चे, लॅंबोर्गिनी या गाड्या विविध चित्रपटात आपण पाहिल्या आहेत. या गाड्यांचे अनेकांना आकर्षण असते. या कंपनीच्या कारसह कावासकी निंजा, हायाबुसा, दुकाटी, बीएमडब्ल्यू, आदी कंपनीच्या गाड्याही राहणार आहेत. कार्यक्रमासाठी सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक सोहम संजय राठोड यांनी दिली आहे