मुकेश इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारव्हा तालुक्यात कुठेही साप निघाला की, त्याला मारू न देता पकडणे व सुरक्षितरीत्या जंगलात सोडून देणे हे येथील एका कार्यकर्त्याचे नित्याचेच कार्य झाले आहे. त्याने आतापर्यंत सात हजार सापांना पकडून जीवदान दिले आहे. विनोद वांड्रसवार, असे या जिगरबाज सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे.
नुसते साप असे जरी म्हटले तरी अनेकांची भंबेरी उडते. प्रत्यक्षात साप दिसला तर काय अवस्था होते, हे सांगायलाच नको; परंतु लोकांच्या मनातील सापांची भीती दूर करण्यासाठी विनोद गेल्या १५ वर्षांपासून धडपडत आहे. केवळ सर्पमित्रच नव्हे, तर आपत्कालीन परिस्थितीत कुणाच्याही मदतीला धावून जाणे, हा त्याचा छंद बनला आहे.
सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते; परंतु सपांच्या जातींविषयीच्या माहितीअभावी याच मित्राला शत्रू समजून मारले जाते. संख्येत वाढ झाल्याने आता साप रहिवासी परिसर आणि घरातही आढळतात. भीतीपोटी त्याला मारण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे. सापांविषयीची हीच भीती दूर करण्याचे काम विनोद अनेक वर्षांपासून करीत आहे. पूर्वी कोठारी परिवार सर्पमित्र म्हणून परिचित होता. त्यांचे हे कार्य विनोदने पुढे सुरू ठेवले आहे. त्याला फोन केला की, लगेच हजर होऊन सापाला पकडून वन विभागात नोंद केल्यानंतर सुरक्षित जंगलात सोडून दिले जाते. आतापर्यंत जवळपास सात हजार सापांना त्याने जीवदान दिले आहे.
इंडियन कोब्रा, अजगर, परड, धामण यासह अनेक जातींच्या सापांचा यात समावेश आहे. शहर व ग्रामीण भागात स्वखर्चाने त्याचे हे कार्य सुरू आहे. मुलगा, मुलगी, पुतणे आदींना या कार्यात सहभागी करून घेऊन सापांना वाचविण्याचा संदेश देण्याचे काम केले जात असून, या कार्याचे कौतुक होत आहे.
जनजागृतीची आवश्यकता
या परिसरात केवळ मोजक्या सापांच्या जाती विषारी आहेत. मात्र, बिनविषारी साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात; परंतु याविषयी अनेकांना माहिती नसल्यामुळे सापांविषयी भीतीचे वातावरण असते. त्यामुळे ही भीती दूर व्हावी, तसेच सापांना वाचवण्यासाठी विविध माध्यमांद्वारे जनजागृतीची आवश्यकता आहे.
आपत्कालीन परिस्थितीत धाऊन जाणारा कार्यकर्ता
सर्पमित्र नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीत धाऊन जाणारा कार्यकर्ता म्हणून विनोद वांड्रसवारची ओळख आहे. हरिण, रानडुक्कर, माकडे, रोही आदी वन्यप्राण्यांसह पाळीव प्राण्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्याने वाचविले. गोरक्षण, बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कारासह अनेक सामाजिक कार्ये तो करतो. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये त्याने अधिकारी, कर्मचारी, कोरोना योद्धे, भिक्षेकरी आदींना चहा, बिस्कीट व भोजनाची व्यवस्था करून मानवतेचा परिचय दिला.