ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शासन कमी पटाच्या शाळा बंद करत आहे. परंतु, यात गोरगरिबांच्या मुलांचेच नुकसान होणार आहे. जिल्ह्यातील पारधी बेडे, तांडे, वाडी, पोड यांना शाळामुक्त करण्याचा शासनाचा डाव आहे का, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील २१ गावांतील पालकांनी उपस्थित केला. शाळाबंदीच्या विरोधात शुक्रवारी येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनच्या पुढाकाराने बाधीत आणि भविष्यात बाधीत होऊ शकणाºया गावकऱ्यांनी आंदोलन केले. शासनाने १० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद केल्या आहेत. आता ३० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती शासनाने मागितली आहे. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषदेच्या आणखी शाळा बंद होण्याचा धोका आहे. कोलाम पोड, बंजारा तांडे, पारधी बेडे असलेल्या वस्त्यांमधील शाळांवरच कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. असे झाल्यास प्रामुख्याने मुलींचे शिक्षण खुंटून बालविवाहाचे प्रमाण वाढण्याचा धोका आंदोलकांनी व्यक्त केला. शिक्षण हा मुलांचा अधिकार असून ते पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही नवीन शाळांची मागणी करीत नाही. मात्र, आमच्या गावात जी शाळा सुरू आहे, ती सुरू ठेवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. एकट्या यवतमाळ तालुक्यात ४५ शाळांवर बंदीची कुºहाड कोसळणार आहे. जिल्ह्यात हा आकडा ५०० च्या पलीकडे जाण्याचा धोका आहे. असे झाल्यास गरिबांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात वाताहत होण्याची शक्यता आंदोलनात व्यक्त करण्यात आली.यवतमाळ तालुक्यातील वडगाव, येळाबारा, अकोलाबाजार, घटाना केंद्रातील गणेशपूर, चौकी आकपुरी, चौकी झुली, येळाबारा पोड, मुरझडी, येवती, वरुड, हातगाव, वरझडी, कारेगाव, यावली, रामपूर, वडगाव, धानोरा, सुकळी, आकपुरी, वागदरा, रामवाकडी, दुधना पोड या गावातील पालकांनी आंदोलनात शासन निर्णयाचा विरोध केला. विशेष म्हणजे, ३० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या गावातील लोकांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर विरुडकर, समन्वयक सुनिल भेले, राहुल कचरे, बंडू उईके, पुंडलीक कनाके, अशोक मेश्राम, विनायक रामगडे, अनिल नैताम, रमेश जाधव, विनोद राठोड, विठ्ठल दडांजे, विजय विरुटकर, किशोर जाधव, गणेश जाधव, संजय गज्जलवार, नयना पाटील, नीलेश जैस्वाल, भारत गाडेकर आदी उपस्थित होते.ग्रामसभांचे ठराव देणार शासनालायेत्या जागतिक महिला दिनी ८ मार्चला सर्वत्र ग्रामसभा होणार आहे. त्यात या २१ गावातील नागरिक कमी पटाच्या शाळा बंद करू नये, असा ठराव घेणार आहे. जिल्ह्यातील इतरही गावांनी असे ठराव करून फेडरेशनकडे पाठवावे. हे सर्व ठराव शासनाकडे पाठविण्यात येईल व त्या आधारेच न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात येईल, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर विरुडकर, समन्वयक सुनिल भेले यांनी दिली.आमच्या पोडावर स्वातंत्र्य नाही का?कोलाम पोडांवर शाळा आहे, म्हणून सध्या स्वातंत्र्यदिन-गणराज्यदिनाला झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा होतो. आता शासन पोडांवरील शाळाच बंद करीत आहे. मग कोलाम पोडांवर राष्ट्रीय सण साजरे करायचे नाही का? आमच्या पोडांवर स्वातंत्र्य नाही का? असे गंभीर प्रश्न यावेळी आंदोलक गावकºयांनी उपस्थित केले.
तांडे, पोड शाळामुक्त करणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:28 PM
शासन कमी पटाच्या शाळा बंद करत आहे. परंतु, यात गोरगरिबांच्या मुलांचेच नुकसान होणार आहे. जिल्ह्यातील पारधी बेडे, तांडे, वाडी, पोड यांना शाळामुक्त करण्याचा शासनाचा डाव आहे का,
ठळक मुद्देसंतप्त सवाल : शाळा वाचविण्यासाठी २१ गावांतील पालकांचे धरणे