एकेकाळी मैदान गाजवणारा पैलवान आयुष्याच्या मैदानात चीत झाला आहे. त्याची दशा पाहून आपोआपच आपल्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतील, अशीच कहाणी आहे, एका मरणयातना भोगणाऱ्या पैलवानाची. ज्याचं नाव आहे हरी गांगू राठोड. पैनगंगा अभयारण्य व सहस्त्रकुंड धबधब्याजवळ असलेले रोडा नाईक तांडा हे हरीचे गाव. ४५ वर्षांपूर्वी ऐन उमेदीच्या काळात भल्याभल्या बलदंड पैलवानांना हरीने आखाड्यात पाणी पाजले. पंचक्रोशीमध्ये कोठेही यात्रा असो, तेथे हरी जाऊन कुस्ती जिंकून येत होता. हरीची कुस्ती पाहण्यासाठी लोक बैलगाडी, सायकल, पायदळ जमायचे. हरीलासुद्धा कुस्ती खेळण्याचा हुरूप यायचा. त्यामुळे त्याला राज्य स्तरावर खेळण्याचे स्वप्न पडू लागले आणि लोकांनासुद्धा हा नक्कीच राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळेल, असा विश्वास वाटू लागला. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
एके दिवशी यात्रेत हरी कुस्ती खेळताना समोरच्या प्रतिस्पर्ध्याने कंबरतोड डाव खेळाला. गाफील हरीच्या तो डाव लक्षात आला नाही आणि त्यामुळे गंभीर दुखापत झाली. तत्काळ त्याला रुग्णालयात भरती केले. मात्र, पैशांअभावी उपचार झाले नाही. तो ३० वर्षांचा असतानाच त्याचे आई, वडील त्याला सोडून गेले. त्यामुळे हरी पूर्णपणे खचला. त्याला कायमचे अपंगत्व आले. कमरेवर घसरत तो जीवन जगू लागला. अपंगत्वामुळे त्याला भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. शासनानेही त्याला कोणतीही मदत केली नाही. आज त्याचे वय ६५ वर्षे आहे. वृद्धापकाळात आनंदात जीवन जगण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. दारोदारी भीक मागून पोट भरण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. त्याच्याजवळ राहण्यासाठी घरसुद्धा नाही.
बॉक्स
कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नाही
हरीला आजपर्यंत शासनाच्या अपंगांसाठी असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही.
त्याच्याकडे पाहून अक्षरशः दगडालाही पाझर फुटेल, अशी स्थिती आहे. मात्र, शासनाला त्याची दया आली नाही. त्याला कुणीही वाली नाही. प्रशासनाने दखल घेऊन त्याला दिव्यांग व्यक्तिंसाठी असलेल्या एखाद्या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी गावकरी करत आहेत. कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या पैलवानाच्या जीवनाची फरपट थांबवावी, अशी अपेक्षा आहे.