तीन वेगवेगळे नकाशे : ‘सीएमओ’ने विचारला जाब लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाभूळगाव दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरला तीन वेगवेगळ्या नकाशांमुळे चुकीची दिशा मिळाली. याच कारणावरून मुख्यमंत्र्यांचे कार्यालय संतप्त झाले. तेथील अधिकाऱ्यांनी स्थानिक बांधकाम अभियंत्यांना या चुकीबाबत जाब विचारला. शनिवार ६ मे रोजी मुख्यमंत्री जलयुक्त शिवार व सिंचन विषयक कामांची पाहणी तसेच आढावा बैठकीसाठी बाभूळगावच्या दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी सुरुवातीला पंचायत समितीनजीकचे मोकळे मैदान निश्चित करण्यात आले होते. नंतर दुसरी शाळा ठरली. परंतु त्यानंतर पुन्हा हे ठिकाण बदलविले गेले. पंचायत समितीपासून बसस्थानक परिसराकडे हेलिपॅड उभारणे निश्चित झाले. बाभूळगावातील गुगलिया ले-आऊटच्या मैदानात अखेर हेलिपॅड बनले. परंतु बुलडाण्याहून आलेल्या या हेलिकॉप्टरची दिशा काहीशी बदलली होती. कारण यवतमाळच्या बांधकाम विभागातून हेलिपॅडच्या अनुषंगाने तीन नकाशे प्रशासनामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविले गेले होते. त्यामुळे नेमके हेलिपॅड कुठे याबाबत संभ्रम झाला. बाभूळगावच्या हेलिपॅडसाठी हेलिकॉप्टरला अक्षांश २०-३३-४१ आणि रेखांश ७८-०८-४८ निश्चित झाले होते. मात्र पायलटचा संभ्रम झाला. चुकीच्या नकाशामुळे कदाचित हे हेलिकॉप्टर ५० किलोमीटर आधीच उतरले गेले असते. मात्र वेळ टळली आणि हेलिकॉप्टर बाभूळगावात सुखरुप उतरले. परंतु चुकीच्या व एका पेक्षा अधिक संख्येने दिल्या गेलेल्या नकाशाचा विषय मुख्यमंत्री कार्यालयात (सीएमओ) गांभीर्याने घेतला आहे. या मुद्यावर बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाकडे जाब विचारुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. नकाशा बनविणाऱ्या बांधकाम खात्याकडे बोट दाखवून प्रशासनाने हातवर केल्याचे बोलले जाते. हे नकाशे येथील बांधकाम अभियंत्यांनी बनविले आहेत. हेलिपॅड बाबत हेलिकॉप्टरला दिलेल्या नकाशाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट बांधकाम विभागाला विचारणा झाली आहे. जिल्हा प्रशासन स्तरावर हे प्रकरण कुठेही नाही. - राजेश खवलेनिवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ ऐनवेळी हेलिपॅडचे स्थळ बदलले गेल्याने एकापेक्षा अधिक नकाशे बनविले गेले. प्रशासनाच्या सूचनेनुसार नकाशाचे हे बदल करावे लागले. तसे ‘सीएमओ’ला कळविण्यात आले. मात्र पहिला नकाशा पाठविण्यासाठी तुम्ही एवढी गडबड का केली, असा सवाल ‘सीएमओ’कडून विचारला गेला.- चंद्रकांत कारियाउपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, यवतमाळ.
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला बांधकामची चुकीची दिशा
By admin | Published: May 09, 2017 1:14 AM