अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुलींकडे कमजोर म्हणून पाहणाºया समाजात एक वडील आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देतो. अपार मेहनतीनंतर त्यांना जागतिक दर्जाच्या कुस्तीपटू म्हणून तयार करतो... दंगल सिनेमात हा संघर्ष अनेकांनी पाहिला असेलच. पण सिनेमा येण्याच्या कितीतरी पूर्वीच ही कथा चक्क आपल्या यवतमाळात आकार घेत होती..! एक सामान्य माणूस आपल्या दोन नव्हे, तीन मुलींना कुस्तीच्या आखाड्यात प्रशिक्षित करीत होता. लाल मातीत संघर्ष करता-करता सामाजिक मापदंडांसोबतही दंगल सुरू झाली. पण साºयाच अडथळ्यांना पटकणी देत आणि पुरुषांना धूळ चारत तिन्ही बहिणी राज्य-राष्ट्रस्तरावरील कुस्तीगीर म्हणून पुढे आल्या अन् पित्याच्या चेहºयावर मैदान मारल्याचे समाधान पसरले...आमीर खानच्या अदाकारीने रूपेरी पडद्यावरची दंगल यवतमाळातही सुपरहीट झाली. पण खुद्द यवतमाळच्याच मातीतली दंगल अनेकांच्या कानावरही नाही. कसा होता हा संघर्ष? यवतमाळसारख्या गाव वजा शहरात मुलींना महाविद्यालयात पाठवितानाही पालकांचा उर धपापतो. त्याच यवतमाळात वसंतराव खडसे नावाच्या पित्याने आपल्या तिन्ही मुलींना चक्क कुस्तीच्या मैदानात उतरविले. पुरुषांची मक्तेदारी असलेले हे क्षेत्र. पण त्यांच्या मुलींची नावेही विजयश्री लावूनच आलेली. जयश्री, भाग्यश्री आणि यशश्री! यातील पहिल्या दोघी विविध स्तरावरच्या कुस्त्यांमध्ये विजयी ठरत गेल्या... शिकतही गेल्या आणि आज पाचगणीच्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका झाल्या.तिसरी यशश्री. वसंतरावांनी २००६ पासून तिला यवतमाळच्या हनुमान आखाड्यात उतरविले. दणकट देहयष्टी ही कुस्तीची पहिली अट पूर्ण करण्यासाठी हवा पुरेसा पोषक आहार. मात्र, पणन महासंघात लिपिक म्हणून काम करणाºया वसंतरावांची आर्थिक स्थिती बेताचीच. पण लढवैय्यांना अडचणी म्हणजे संधी वाटते. वसंतराव आणि यशश्री सकाळी ६ वाजता हनुमान आखाड्यात सायकलने यायचे. तिथे बाळासाहेब मांगूळकर, उद्धवराव बाकडे, अनिल पांडे, गटलेवार पहेलवान, सुभाष जुमळे यांच्या मार्गदर्शनात यशश्रीची लढत व्हायची मुलांसोबत. वणीत विदर्भ केसरी स्पर्धा झाली तेव्हा या तिन्ही भगिनी पहिल्यांदाच दंगलीत उतरल्या. पहिल्याच दणक्यात तिघींनीही ३२ किलो वजनगटात सुवर्णपदक खेचून आणले. तेव्हापासून जेवढ्या विदर्भ केसरी झाल्या, त्या प्रत्येक वेळी यशश्रीने गोल्ड आणले. यशश्रीने ‘चंद्रपूर महापौर केसरी’ हा खिताब पटकावल्याचे सांगताना वसंतरावांचा उर अभिमानाने भरून येतो. अलिकडेच आळंदीत झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यशश्रीने पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले आहे. हा तिचा ताजा विजय तिच्यासाठी मोठी प्रेरणा ठरला असून आता आॅलिंपिक, राष्ट्रकुल स्पर्धांसाठी धडपड सुरू आहे.कुस्ती जिंकण्यासाठी स्वत:वर विश्वास महत्त्वाचा आहे. मी ५० मुलांमध्ये एकटी मुलगी सराव करते. पण इथे नियम पाळले जातात. सर्व सहकारी माझा आदर राखतात. ताकदीने विश्वास निर्माण होतो. यवतमाळात कुस्तीसाठी सुविधा वाढण्याची गरज आहे.- यशश्री खडसे,कुस्तीपटू, यवतमाळमुलगी जेव्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरते, तेव्हा मैदानातल्या लढाईइतकीच समाजातली लढाईही जिकरीची ठरते. पण मी कोणाचाही विचार केला नाही. माझ्या मुली कुस्तीपटूच झाल्या पाहिजे हे माझे ध्येय होते. आज त्या यशस्वी होत आहेत. त्यांनी यापुढेही जावे. आॅलिंपिक, राष्ट्रकुलमध्ये मजल मारावी.- वसंतराव खडसे,कुस्तीगीर यशश्रीचे वडीलगीता फोगटसोबत जेव्हा लढाई झालीज्या फोगट भगिनींची कथा दंगल सिनेमात मांडली गेली, त्याच गीता फोगटसोबत यवतमाळची यशश्री खडसे प्राणपणाने झुंजली. २०११ मधील ही गोष्ट आहे. दंगल सिनेमा तेव्हा यायचाच होता. झारखंडमध्ये झालेल्या स्पर्धेत गीता फोगट आणि यशश्री खडसेची कुस्ती पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक लोटले होते. अटीतटीच्या या लढाईत थोड्याशा फरकाने गीता जिंकली. कुस्तीच्या क्षेत्रात आलेले नवनवे तंत्र, सुविधा माझ्याकडे नव्हत्या. त्यामुळे माझा आत्मविश्वास त्यावेळी कमी पडला, असे यशश्री प्रांजळपणे सांगते. गीता थोडी घमेंडी आहेच; बबिता फोगट मात्र शांत स्वभावाची वाटली, असा अनुभवही यशश्रीने सांगितला. यशश्रीसोबतच जोडमोहा (ता. कळंब) येथील ज्ञानदेवराव खेकडे या शेतकºयाची मुलगी दिव्या सराव करते. तिनेही आळंदीची स्पर्धा गाजवली. फोगट भगिनींसारख्याच यवतमाळच्या यशश्री, भाग्यश्री, जयश्री या मुलीही पुरुषी मक्तेदारी मोडीत काढायला सज्ज आहेत.
पुरुषांना धूळ चारणारी कुस्तीपटू यशश्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 10:01 PM
मुलींकडे कमजोर म्हणून पाहणाºया समाजात एक वडील आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देतो. अपार मेहनतीनंतर त्यांना जागतिक दर्जाच्या कुस्तीपटू म्हणून तयार करतो...
ठळक मुद्देमुलीसाठी पित्याची धडपड : यवतमाळच्या मातीत ‘दंगल’ची आणखी एक पटकथा