नगरपरिषद : शहराच्या जुन्या ‘अॅक्शन प्लॅन’ची मुदत संपतेयरूपेश उत्तरवार - यवतमाळ शहराची वाढती लोकसंख्या, विकसित होणारे नगरे आणि मूलभूत सुविधांसाठी नगररचना विभागाच्या माध्यमातून शहराचा अॅक्शन प्लॅन तयार केला जातो. यवतमाळ शहराच्या अॅक्शन प्लॅनची मुदत संपत आली तरी नवीन नियोजन तयार करण्यातच आले नाही. आजही यवतमाळचा विकास १९९२ साली म्हणजे २३ वर्षापूर्वी तयार केलेल्या अॅक्शन प्लॅननुसारच सुरू आहे. त्यातच शासनाकडून प्रस्तावित निधीही मिळाला नाही. परिणामी शहराच्या विकासाची गती मंदावल्याचे दिसत आहे. यवतमाळ शहराला ऐतिहासिक वारसा आहे. चहूबाजूंनी घनदाट जंगल आणि घाटमाथ्यावर शहर वसले आहे. गत काही वर्षांपासून यवतमाळ शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यातच लगतच्या ग्रामपंचायतींचाही भार नगर परिषदेला सोसावा लागतो. अशा स्थितीत शहराचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे असते. यासाठी नगर रचना विभागाच्या माध्यमातून शहराचा १७ ते २० वर्षासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला जातो. यवतमाळ शहराचा अॅक्शन प्लॅन १९९२ साली तयार करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी १९९८ साली करण्यात आली. त्या वेळी शहराच्या विकासासाठी १३ कोटी ७४ लाख रुपये अपेक्षित होते. मात्र आता १७ वर्ष झाले तरी नवीन कृती आराखडा तयारच करण्यात आला नाही. त्यामुळे शहराच्या शिस्तबद्ध विकासाला खीळ बसली. शासनाकडे विविध विकासाच्या नावाखाली मागितलेला निधीही नगर परिषदेला पुरेसा मिळाला नाही. १९९८ मध्ये लागू झालेल्या अॅक्शन प्लॅननुसार यवतमाळ शहरात एक हजार १६ चौरस हेक्टर जागा नियोजनासाठी उपलब्ध आहे. त्यात १६७ चौरस हेक्टर जमीन नगरपरिषदेच्या मालकीची, आठ चौरस हेक्टर सार्वजनिक उपयोगाची, १५० चौरस हेक्टर रस्ते आणि रेल्वेसाठी २७ चौरस हेक्टर, बगीचे आणि खेळाच्या मैदानासाठी १५८ चौरस हेक्टर, कृषी उपयोगासाठी गृहित धरण्यात आली होती. तसेच यवतमाळ शहरात १५४ चौरस हेक्टर जमीन व्हॅकंट बॅरल (पडिक जमीन) आणि २० चौरस हेक्टर जमीन नाले आणि तलावांची आहे. या ठिकाणी विकास करण्यासाठी नगरपरिषदेने अॅक्शन प्लॅन तयार केला होता. दरम्यानच्या काळात विकास आणि नियोजनाकडे निधी अभावी दुर्लक्ष झाले. मात्र नगर रचना विभाग नगरपरिषदेला सूचना करणार असून येत्या काही वर्षात अॅक्शन प्लॅन तयार केला जाईल.
यवतमाळ २३ वर्षे जुन्या नियोजनावरच
By admin | Published: January 12, 2015 10:58 PM