- विशाल सोनटक्के यवतमाळ - दारव्हा शहर व परिसरात सातत्याने चोरीचे सत्र सुरू असतानाच आता पोलिस निरीक्षकाच्या घरातूनच ७० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना पुढे आली असून या प्रकरणी सफाई कामगाराविरुद्ध दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दारव्हा ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी हे १२ ते १७ मे या कालावधीत सुटीवर गेले होते. त्यांच्या बंगल्याची चावी सफाई कामगार संतोष चव्हाण याच्याकडे ठेवण्यात येत असे. कुलकर्णी हे रजेवरून परतल्यानंतर त्यांनी माहिती घेतली असता सफाई कामगार संतोष हा १५ मेपासून पोलिस ठाण्यात कामावर येत नसल्याचे समजले. त्यास भ्रमणध्वनीवरून कॉल केल्यानंतरही तो कामावर न आल्याने त्याच्याबाबत संशय बळावला. कुलकर्णी यांनी घरातील बॅगेची पाहणी केली असता बॅगेतील ७० हजार रुपये जागेवर नसल्याचे आढळले.
घराचा कडीकोंडा तसेच कुलूप सुरक्षित असल्याने ही चोरी सफाईकामगार संतोष यानेच केल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत असल्याने त्याच्याविरुद्ध भादवि कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी चिलुमूला रजनिकांत यांनी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करीत आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून दारव्हासह जिल्ह्यात बंद घरे चोरट्याच्या रडारवर आहेत. पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी हे १२ ते १७ मे या कालावधीत सुटीवर गेल्यानंतर चोरट्यांनीच संधी साधली असून बदनामीच्या भीतीने त्या पद्धतीने ही घटना रेकॉर्डवर येणार नाही याची खबरदारी पोलिस प्रशासनाकडून घेतली जात असल्याची चर्चा आहे.