यवतमाळ : विमानतळांच्या आधुनिकीकरण देखभाल दुरुस्तीसाठी करार झाल्यानंतर सहाजिकच दर्जेदार विमानसेवा उपलब्ध होईल, अशी यवतमाळकरांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात घडले उलटेच. रिलायन्ससोबत करार केल्यापासून यवतमाळच्या विमानतळाचे कामकाज ठप्प झाले. कहर म्हणजे, करार केल्यानंतर रिलायन्सने ठरल्याप्रमाणे एकही काम केले नाही. मात्र तरीही मागील २४ वर्षांपासून राज्य शासनाला हा करार संपुष्टात आणण्याचे धाडस दाखवता आलेले नाही. पर्यायाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या अडीचशे एकरवरील या विमानतळाला आज माळरानाचे स्वरूप आले आहे. रिलायन्ससोबत करार झालेल्या राज्यातील इतर विमानतळाची अवस्थाही यवतमाळसारखीच झाली आहे.
सर्वाधिक आणि दर्जेदार कापूस पिकविणारा जिल्हा अशी यवतमाळची ओळख आहे. विमानतळामुळे येथील उद्योग व्यवसायाला गती मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील या अपेक्षेने ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी कठोर परिश्रम घेऊन यवतमाळमध्ये विमानतळ उभारले. या विमानतळामुळेच यवतमाळमध्ये पुढे हजारो हातांना काम देणारा रेमण्डसारखा मोठा प्रकल्प आला.
दरम्यान २००८ मध्ये केंद्र शासनाने उडाण योजनेच्या माध्यमातून छोटी शहरे विमानतळाने जोडण्याची योजना जाहीर केली. या योजनेनुसार विमानतळांचे आधुनिकीकरण, अर्थसहाय्य, विकास व देखभाल तसेच दुरुस्ती आणि व्यवस्थापन या अटी आणि शर्तीनुसार २००९ मध्ये यवतमाळसह राज्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद व बारामती या ठिकाणची विमानतळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडे हस्तांतरित केली. सुरुवातीच्या काळात रिलायन्सने या विमानतळावर किरकोळ दुरुस्त्या केल्या. मात्र त्यानंतर पुढील कार्यवाहीकडे साफ दुर्लक्ष केले. पर्यायाने यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळावरील हवाई सेवा मागील २४ वर्षांपासून केवळ कागदावरच राहिली आहे. सध्या या विमानतळाची प्रचंड दुरावस्था झाली असून, रिलायन्स कंपनीचे केवळ दोन वॉचमन या अडीचशे एकरावरील विमानतळाची देखभाल करताना दिसतात.
लातूरमध्ये केवळ मंत्र्यांसाठीच हवाई सेवा
२००८ मध्ये लातूर येथे विमानतळाची निर्मिती झाली. या विमानतळावरून नियमित वेळापत्रकानुसार शेवटचे विमान उड्डाण २१ ऑगस्ट २००९ रोजी झाले. त्यानंतर खासगी कंपनीसोबत विमानसेवेचा करार झाला. काही दिवसांनंतर ही सेवा बंद झाली, ती अद्यापही जैसे थे आहे. सध्या मंत्रीमंडळातील महत्त्वाचे व्यक्ती तसेच शासकीय कामानिमित्त येणाऱ्या विमानांची ये-जा सुरू असल्याचे येथील विमानतळाचे व्यवस्थापक राजेश जीवन यांनी सांगितले.
उस्मानाबादमध्ये व्यावसायिक विमानाचे उड्डाणच नाही
उस्मानाबादनजीक खेड येथे १९८४ मध्ये पद्मसिंह पाटील यांच्या पुढाकाराने विमानतळाची उभारणी झाली. मात्र निर्मितीपासून ते आजतागायत येथून एकाही व्यावसायिक विमानाचे उड्डाण झालेले नाही. २००९ मध्ये हे विमानतळही रिलायन्स कंपनीकडे भाडे तत्वावर आहे. कोरोनापूर्वी काही काळ येथे खासगी कंपनीकडून वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होते. मात्र त्यानंतर रन-वे बंद असल्याने या ठिकाणीही आता विमान उतरू शकत नाही.
नांदेडातील विमान सेवाही झाली ठप्प
२००८ मध्ये गुरु-ता गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्ताने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेत समावेश करून शहरासाठी अडीच हजार कोटींचा निधी मिळाला. या निधीतील कोट्यवधी रुपये खर्चून नांदेड विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले. कोरोनापूर्वी या विमानतळावरून मुंबई, हैदराबाद, औरंगाबादसह दिल्ली, चंदीगड, अमृतसर या ठिकाणी विमानसेवा सुरू होती. मात्र एक-एक विमानसेवा बंद होत गेली. आता येथेही नियमित विमानसेवा ठप्प झाली आहे.