- संतोष कुंडकर यवतमाळ - घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले की, अंत्यसंस्काराच्यावेळी त्याच्या पत्नीचे कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवे काढणे, मंगळसूत्र तोडणे, आदी मनस्ताप देणारे सोपस्कार करून त्या महिलेला वैधव्य बहाल करण्याची परंपरा तशी जुनीच. यातून तिला होणाऱ्या मानसिक वेदनांची मात्र पर्वा कुणालाच नसते; परंतु, मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील धंदरे कुटुंबीयांनी अशा बुरसट विचारांना नाकारून विधवा परंपरेला फाटा देत निधन झालेल्या मुलावर अगदी साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले. यातून त्यांनी समाजापुढे एक आगळा आदर्श ठेवला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.
झाले असे की, मांगरूळ येथील गोरखनाथ धंदरे यांचा मुलगा प्रफुल्ल धंदरे (४०) याचे दीर्घ आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्याच्या मागे आई शांताबाई, वडील गोरखनाथ, पत्नी निलिमा, मुलगा शौर्य (१०), मुलगी तपस्या (७), मनोज, समीर हे दोन भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मारेगाव येथे कृषी केंद्र चालविणाऱ्या प्रफुल्लचे निधन झाल्यानंतर धंदरे कुटुंबावर दु:खाचा पहाडच कोसळला. निधनानंतर नागपूर येथून त्याचे पार्थिव मांगरूळ येथे आणण्यात आले.
काकांनी घेतला पुढाकारप्रफुल्ल धंदरे याचे काका मधुकर धंदरे हे नागपूरला वास्तव्याला आहेत. ते राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक आहेत. सोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. देहदान, नेत्रदानाच्या चळवळीतही ते सक्रिय आहेत. प्रफुल्लवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू झाल्यानंतर पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या मधुकर धंदरे यांनी सर्वप्रथम विधवा प्रथेला विरोध केला. असे कुठलेही सोपस्कार न करता अंत्यसंस्कार करण्याचा विचार त्यांनी सर्वांसमोर मांडला. भाऊ गोरखनाथ धंदरे व त्यांच्या कुटुंबीयांतील सर्वांनीच यासाठी सहमती दर्शविली. त्यानंतर प्रफुल्लची पत्नी निलिमा हिच्यावर विधवा परंपरेचे कोणतेही सोपस्कार न करता प्रफुल्लच्या पार्थिवावर अगदी साध्या पद्धतीने मांगरूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सामाजिक दडपणातूनच परंपरेचे जतनअनेक सामाजिक परंपरांना तसा काही अर्थ नसतो; परंतु, तरीही कोण काय म्हणेल, या दडपणातून कालबाह्य झालेल्या परंपरांचे जतन केले जात असल्याचे चित्र समाजात पाहायला मिळते. विधवा ही परंपरादेखील त्यातलीच एक परंपरा आहे. सामाजिक टिकेचा धनी कुणी व्हायचे, याच मानसिकतेतून साऱ्या कालबाह्य परंपरांचे जतन केले जात आहे. मात्र, मांगरूळच्या धंदरे कुटुंबीयांनी या कुप्रथेच्या विरोधात केलेल्या बंडाचे पुरोगामी विचारवंत व या विचारांचे समर्थन करणाऱ्यांमध्ये कौतुक होत आहे.