लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ बसस्थानकाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. हे नवे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून बसस्थानक आर्णी मार्गावरील एसटी महामंडळाच्याच विभागीय कार्यालयाच्या परिसरात महिनाभरात हलविले जाणार आहे. त्यासाठी आगारातील दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.यवतमाळचे बसस्थानक राज्यातील उत्तम दर्जाचे बसस्थानक म्हणून नावारूपाला येणार आहे. तसे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. १२ कोटी रूपयांचा निधी खर्च करून हे बसस्थानक जुन्या जागेवर उभारले जाणार आहे. सोलर लॅम्प, तळघरात दुचाकी वाहनांची पार्किंग आणि विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.अद्ययावत तंत्रज्ञानाची या बसस्थानकाला जोड दिली जाणार आहे. याकरिता जुने बसस्थानक पाडले जाणार आहे. तोपर्यंत प्रवाशांसाठी पर्यायी बसस्थानक उभारून दिले जाणार आहे. त्याकरिता प्रारंभी अभ्यंकर कन्या शाळेपुढील जागा मागण्यात आली होती. या जागेला परवानगी मिळाली नाही. यामुळे राज्य परिवहन मंडळाने विभागीय कार्यालयातील जागेचा वापर करण्याचा निर्णय घेतला.ही जागा बसस्थानकाइतकीच आहे. यामुळे या ठिकाणी पर्यायी बसस्थानक म्हणून साफसफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. नवीन बसस्थानकाची निर्मिती होईपर्यंत याच ठिकाणी पर्यायी बसस्थानक उभे राहणार आहे. यामुळे जुन्या बसस्थानकाची जागा रिकामी करण्यासाठी दुकानदारांना परिवहन विभागाने नोटीस बजावल्या आहेत.येत्या महिनाभरात नवीन जागेवर पर्यायी बसस्थानक उभे राहणार आहे. नवीन बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतरच या ठिकाणी पुन्हा बसगाड्या येणार आहेत. नवीन बसस्थानकाच्या पर्यायी जागेवर युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. आर्णी मार्गावर रपटे तयार करण्याचे काम सुरू आहे.नवीन बसस्थानकाची निर्मिती होईपर्यंत एकच पर्यायी बसस्थानक राहणार आहे. हे काम लवकरच सुरू होणार असून नागरिकांना नवे बसस्थानक पहायला मिळणार आहे.- श्रीनिवास जोशी,विभाग नियंत्रक, यवतमाळ
यवतमाळचे बसस्थानक हलविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 6:00 AM
यवतमाळचे बसस्थानक राज्यातील उत्तम दर्जाचे बसस्थानक म्हणून नावारूपाला येणार आहे. तसे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. १२ कोटी रूपयांचा निधी खर्च करून हे बसस्थानक जुन्या जागेवर उभारले जाणार आहे.
ठळक मुद्देदुकानदारांना आगाराच्या नोटीस : आर्णी मार्गावरील विभागीय कार्यालयाची साफसफाई