लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात राजकीय पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी यांना जनतेच्या हिताची कामे हातावेगळी करता आली नाही. पाच वर्षे केवळ आरोप-प्रत्यारोप करून शहरात अनेक समस्यांचे डोंगर उभे केले. अशा पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी शहराचा कारभार प्रशासक म्हणून हाती घेतला. त्यांच्या धडक कारवाईने अनेक समस्या कायमस्वरूपी निकाली निघाल्या आहेत. शुक्रवारी त्यांनी अवघड समस्येला हात घातला. काही तासांतच शेकडो मोकाट डुकरं जेरबंद करण्यात आली. याचा प्रतिकूल परिणाम दिसून आला. पोलीस ठाण्यावर प्रकरण पोहोचले. सर्वसामान्य नागरिक मोकाट डुकरांपासून त्रस्त आहेत. नगर परिषद दरवर्षी अर्थसंकल्पात डुकरांच्या बंदोबस्ताकरिता आर्थिक तरतूद करते. मात्र, हा पैसा खर्चच होत नाही. खर्च झाला तरी डुकरं उचलले जात नाही. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मोकाट डुकरांविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली. मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी स्वत: या मोहिमेचे नेतृत्व हाती घेतले. लोहारा, वाघापूर, वडगाव परिसरातून दुपारपर्यंत ४५० च्या वर डुकरं जेरबंद करण्यात आली. डुकरांच्या भरवशावर उपजीविका भागविणारे संतप्त झाले. कुणी अंगावर पेट्रोल घेतो, विष घेतो, नगरपालिकेसमोरच आत्महत्या करतो, अशा धमक्या देत पालिका कर्मचाऱ्यांवर चालून आले. परिणामाची पूर्ण कल्पना असलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त सोबत घेतला होता. अशांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे समर्थकही पोलीस ठाण्यावर धडकले. अवधूतवाडी पोलीस ठाणे परिसरात जमाव झाला होता. त्यानंतरही कणखर असलेल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी आपली भूमिका कायम असल्याचे सांगत नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न करणारे मोकाट डुकरं पकडले जातील, ही कारवाई थांबणार नाही, असे ठासून सांगितले. आतापर्यंत डुकरं पकडण्याची अशी धडक कारवाई झालेली नाही. त्यामुळे संख्येत अंदाज बांधता येणार नाही. इतक्या प्रमाणात मोकाट डुकरांचा संचार आहे. मोकाट डुकरांचा बंदोबस्त केला जावा, अशा सूचना व वृत्तपत्रांतून जाहीर आवाहन नगरपालिकेने केले. मात्र, संबंधितांनी याची नेहमीप्रमाणे दखल घेतली नाही. यापूर्वी पालिका कर्मचाऱ्यांना धमकावून परत पाठविले जात होते. स्वत: मुख्याधिकारीच कारवाईत पुढे असल्याने पालिका कर्मचाऱ्यांनाही बळ मिळाले आहे.
जनमाणसातून मुख्याधिकाऱ्यांना समर्थनशहरातील अतिक्रमण असो, घनकचरा सफाई असो, रस्त्यावर लागणाऱ्या हातगाड्या आता मोकाट डुकरांचा प्रश्न यावर मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना जनमाणसातून समर्थन मिळत आहे. पहिल्यांदा टक्केवारीचे गणित न जोडता प्रत्यक्ष कामात लक्ष घालणारा अधिकारी शहराला मिळाला आहे.
काहींना खटकतेय कामाची शैली- मुख्याधिकारी माधुरी मडावी या जनतेचे हित ठेवून धडक पद्धतीने काम करत आहेत. ही बाब शहरातील तथाकथित लोकप्रतिनिधी व समाजसेवकांना खटकत आहे. वेगळ्या प्रकारे त्यांना थांबविण्याचा प्रयत्नही करण्यात आला. दबाव तंत्राचाही वापर झाला. जनतेच्या कामासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्याच्या बाजूने आता नागरिकांनीच उभे राहण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काही दिवसात पालिका प्रशासनात बदल होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, याची चर्चा दबक्या स्वरात सुरू आहे.
कर्नाटकातून बोलाविले पथक
- मोकाट डुकरं पकडण्याचे काम अमरावती विभागात कुणालाही दिले तरी प्रत्येकाचे हितसंबंध त्याच्याशी जुळलेले होते, असा पूर्वीचा अनुभव आहे. शिवाय मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पहिल्यांदाच थेट निर्णय घेण्यात आला. कर्नाटकातून मोकाट डुकरं पकडण्यासाठी पथकाला बोलाविण्यात आले. त्यामुळेच काही तासात शेकडाेंच्यावर डुकरांना जेरबंद करून एक ट्रक भरता आला. आता ही कारवाई तीन-चार दिवस चालणार असल्याचेही सांगण्यात आले. आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत सूर्यवंशी याचे नियोजन करत आहे.