लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच मुसळधार पाऊस गुरुवारी झाला. त्यामुळे यवतमाळ शहर जलमय झाले. अनेक घरे व दुकानांमध्येसुद्धा पाणी शिरले.गुरुवारी सकाळी दोन-तीन तास दमदार पाऊस झाला. त्यामुळे यवतमाळातील रस्त्यांवर जणू पूर आला होता. शहरात अनेक भागात पालिकेने सिमेंट रस्त्यांची बांधकामे केली. या बांधकामांमुळे रस्ता उंच आणि घरे ठेंगणी अशी स्थिती झाली. त्यामुळे घरांमध्ये व शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये पाणी शिरले. शहरात बेंबळा धरणावरून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.
ठिकठिकाणी रस्ते खोदले जात आहेत. परंतु काम झाल्यानंतर ते बुजविण्याचे सौजन्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कंत्राटदार दाखवित नाहीत. त्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमधील रस्ते चिखलमय झाले आहे. काळी माती रस्त्यावर असल्याने व त्यात पाऊस आल्याने अपघातही वाढले आहे. यवतमाळ शहरातील मागास वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी लहान मंदिरेही पाण्याखाली आली. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती.