अक्षय कर्णेवार : उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षणाला सुरुवात, दोन्ही हातांनी गोलंदाजी यवतमाळ : जिल्ह्यातील क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड प्रतिभा आहे. या प्रतिभेने नागपूरच्या व्हीसीएला देखील भूरळ पाडली आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण व सोयीसुविधा मिळाल्यास जिल्ह्यातील क्रिकेटपटू रणजी, आयपीएल व भारतीय संघात स्थान मिळवू शकतात, असा विश्वास पांढरकवडा येथील आयपीएल व रणजीपटू अक्षय कर्णेवार याने व्यक्त केला. पद्मविलास क्रिकेट क्लबद्वारा येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण देशपांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून क्रिकेटपटू कुमार चौधरी, पद्मविलास क्रिकेट क्लबचे सचिव प्राचार्य डॉ. उदय नावलेकर उपस्थित होते. पद्मविलास क्लब गरीब, होतकरू व प्रतिभावान क्रिकेटपटूंचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे तसेच तळेगाव(दाभाडे) क्रिकेट अकॅडमीसारखी सुविधा जिल्ह्यातील खेळाडूंसाठीदेखील उभारण्याचे आश्वासन प्राचार्य नावलेकर यांनी यावेळी दिले. संचालन व आभार उमेश अंबाडेकर यांनी मानले. यावेळी प्रा. अरुण वरारकर, अॅड. आशीष तोटे, प्रकाश कासावार, राजू देहारे, विनोद दिघडे, विशाल गहाणे आदी उपस्थित होते. अक्षय कर्णेवार याने याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांना एकाच ओव्हरमध्ये दोनही हातांनी बॉलिंग करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले व मनसोक्त बॅटिंगही केली. शिबिरात अक्षय कर्णेवार याचे प्रशिक्षक बाळू नवघरे, क्रिकेटचे राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन मिलमिले मुख्य प्रशिक्षक म्हणून तर राजू गिरोळकर, संजय जिरापुरे, विशाल गणात्रा सहायक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)
यवतमाळच्या क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड प्रतिभा
By admin | Published: May 04, 2017 12:29 AM