- सुरेंद्र राऊतपारवा - घाटंजी तालुक्यातील झटाळा येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता दोन भावांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. या वादात प्रकरण हाणामारीपर्यंत आले. लहान भावाने मोठ्याकडे दगड भिरकावला. तो दगड डोक्यावर लागताच यात मोठा भाऊ जागेवरच कोसळला. त्यानंतरही लहान्याने त्याला सोडले नाही. दगडाने आणखी प्रहार केले. यात मोठा जागेवरच गतप्राण झाला.
शालिक खेत्रू मसराम (४५) असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर लहान भाऊ मारोती खेत्रू मसराम (४३) याने हल्ला करून त्याला ठार केले. आरोपीची पत्नी माहेरी गेली होती. ती नांदायला येत नसल्याच्या कारणावरून दोन भावात वाद झाला. या वादातच हातापायी सुरू झाली. मारोतीने दगड उचलून शालिकच्या डोक्यात घातला. यात तो जागेवरच कोसळला. त्यानंतरही मारोतीने दगडाने प्रहार केले. नंतर तो बाहेर चालला गेला. हा प्रकार पाहून ग्रामस्थांनी जखमी शालिक याला उपचारासाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी शालिकचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी पार्वता शालिक मसराम यांच्या तक्रारीवरून पारवा पोलिसांनी आरोपी मारोती मसराम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी संदीप महाजन, लखन राठोड, अमोल वाढई, अनिल गिनगुले करीत आहे.