कळंब (यवतमाळ) - पेरणीचे दिवस जवळ आलेले असताना तालुक्यातील एकाही सेवा सोसायटीने पीक कर्जाचे वाटप केले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हा बँकेच्या कळंब येथील बँक निरीक्षकांच्या कक्षाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले होते. या कक्षात बँकेचे उपसरव्यवस्थापक प्रफुल्ल येंडे, बँक निरीक्षक गजानन कापनवार, नीरज भालकर, वसुली अधिकारी अभय कदम होते.
खरेदी-विक्री संघाचे सभापती बालू पाटील दरणे, कळंब विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, प्रा. घनश्याम दरणे, सचिन शेंडे, राजूर संस्थेचे अध्यक्ष रामदास गाडेकर, कोठा संस्थेचे अध्यक्ष देविदास शेटे, संचालक ज्ञानेश्वर ठाकरे, राजू नरवडे, नामदेव पोतदार, संजय दरणे, राहुल कदम, अमोल धोटे यांनी कुलूप ठोकल्यानंतर तातडीने चक्रे हलली. दरम्यान, मंगळवारपासून कर्जवाटप सुरू केले जाणार आहे.
संस्था तपासणीच्या नावाखाली बँकेचे निरीक्षक आणि सहकारी संस्था सचिवांमध्ये वसूलपात्र रकमेच्या वसुलीवरून वाद निर्माण झाला. मे महिना संपत आलेला असतानाही पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कक्षात कोंडून आपला संताप व्यक्त केला. याची माहिती मिळताच मुंबई बाजार समितीचे संचालक तथा कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, बँकेचे संचालक बाबू पाटील वानखेडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे तातडीने कळंब बँकेच्या शाखेत पोहोचले. त्यांनी सोसायटीचे सचिव, बँक कर्मचारी आणि कुलूप ठोकणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेतली. तातडीने कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.