यवतमाळ : खातेदाराकडून २०० रुपये वसूल करण्याचा प्रयत्न भारतीय स्टेट बँकेला चांगलाच अंगलट आला. भरपाई म्हणून आता या खातेदाराला तीन हजार २०० रुपये व्याजासह द्यावे लागणार आहेत. नागपूर येथील सेवानिवृत्ताने दाखल केलेल्या प्रकरणात यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने दिलेल्या आदेशामुळे या बँकेला चांगली चपराक बसली आहे.
नागपूर येथील बेसा भागातील वसुंधरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीत वास्तव्याला असलेले महादेव बारकूजी रोकडे यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या यवतमाळ येथील उमरसरा शाखेत खाते आहे. त्यांनी या खात्याचा एक लाख रुपयाचा धनादेश यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नागपूर येथील देवनगर शाखेच्या नावाने दिला होता. स्टेट बँकेने हा धनादेश वटविण्यासाठी न टाकताच रोकडे यांना परत केला. एवढेच नव्हेतर त्यांच्यावर २०० रुपये दंड बसविण्यात आला.
महादेव रोकडे यांनी या प्रकाराविषयी बँकेशी वारंवार पत्रव्यवहार केला. त्यावर समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात १० मे २०१९ रोजी तक्रार दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. यात रोकडे यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला.
स्टेट बँकेच्या उमरसरा शाखेने महादेव रोकडे यांना तक्रार झाल्यापासून २०० रुपये सात टक्के व्याजासह परत द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासापोटी एक हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे दोन हजार रुपये द्यावेत असा आदेश आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे बँकेच्या मनमानी आदेशाला चपराक बसली आहे.
बँकेने चूक केली
ग्राहकाच्या खात्यात धनादेश वटविला जाईल एवढी रक्कम शिल्लक होती. त्यामुळे या प्रकरणात त्यांची कुठलीही चूक नाही. अशा परिस्थितीत बँकेने दंड आकारण्याचा अधिकार नव्हता. बँकेने २०० रुपये दंड आकारून चूक केली आहे, असे मत ग्राहक आयोगाने नोंदविताना तक्रारदार नुकसानभरपाईसाठी पात्र असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे.