पुसद : सहा वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील १२0६ पैकी ४६१ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहे. तंटामुक्तीची टक्केवारी जवळपास ४0 टक्के इतकी आहे. अद्यापही ६0 टक्के ग्रामपंचायती तंटामुक्तीच्या प्रतीक्षेत असून तंटामुक्तीत यवतमाळ जिल्ह्याची गती कासवाप्रमाणे असल्याचे दिसते. लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात तंटामुक्तीचे प्रमाण ९0 टक्के इतके आहे, हे विशेष. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात १५ ऑगस्ट २00७ पासून आतापर्यंंत जिल्ह्यातील १२0६ ग्रामपंचायतींपैकी ४६१ ग्रामपंचायती शासनाकडून तंटामुक्त घोषित झाल्या आहेत. तंटामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाने विकास कामांसाठी पुरस्कार निधी यापूर्वीच प्रदान केला आहे. यवतमाळ जिल्हा हा मागासलेला असून १६ तालुक्यांमध्ये विभागलेला विस्तीर्ण जिल्हा आहे. जिल्ह्यातील ४0 टक्के ग्रामपंचायती अर्थात ४६१ ग्रामपंचायती तंटामुक्त करून पोलीस प्रशासनाने मिळविलेले यश हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अभूतपूर्व आहे. मात्र अद्यापही ६0 टक्के अर्थात ७४५ ग्रामपंचायती तंटामुक्त होणे बाकी असल्याने तंटामुक्त गाव मोहीम जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला. २0१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील २६८ ग्रामपंचायतींनी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभाग घेतला असून ५ जून ते ५ जुलै १४ च्या कालावधीत तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने अंतर्गत मूल्यमापन करावयाचे आहे. त्याअंतर्गत कळंब पोलीस स्टेशन पाच ग्रामपंचायती, बाभूळगाव २0, वडगाव जंगल - ५, वणी १६, मारेगाव १५, पाटण नऊ, मुकुटबन १0, शिरपूर ११, पांढरकवडा १४, घाटंजी ५, राळेगाव २७, वडकी १0, पारवा १0, दारव्हा ५, नेर ८, आर्णी ५, दिग्रस ५, पुसद शहर ८, पुसद ग्रामीण १0, उमरखेड १0, महागाव २४, बिटरगाव ५, पोफाळी ५, खंडाळा ५, दराटी पोलीस स्टेशनमधील दोन ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशिक्षण कार्यशाळेचे अध्यक्ष तथा अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे यांनी दिली. या प्रशिक्षण कार्यशाळेला जिल्ह्यातील तहसीलदार, ठाणेदार, विधी अधिकारी, पंचायत समिती सभापती उपस्थित होते. यावेळी तंटामुक्त गाव मोहीम कार्यक्षमपणे सुरू ठेवण्यासाठी सर्वांंनी एकदिलाने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)
तंटामुक्त गावमोहिमेत यवतमाळ जिल्ह्याची कासवगती कायम
By admin | Published: June 06, 2014 12:13 AM