आॅनलाईन लोकमतयवतमाळ : केंद्र आणि राज्य सरकारने गाजावाजा करून स्वच्छता मिशन हाती घेतले. मात्र राज्यात शौचालय बांधणीत जिल्हा शेवटच्या क्रमांकावर असून या मिशनची यंत्रणेने जिल्ह्यात पुरती वाट लावली आहे.यंत्रणेच्या उदासीनतेमुळे यवतमाळ जिल्हा राज्यात चक्क शेवटच्या स्थानी आहे. जिल्ह्यात चार लाख २६ हजार ४५० एवढी कुटुंब संख्या आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेस लाईननुसार या सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात दोन लाख ४८ हजार १६० कुटुंबांकडे शौचालये आढळली. उर्वरित एक लाख ७८ हजार २८१ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नाहीत. शौचालयांचे हे प्रमाण ५८.२० टक्के आहे. अर्थात ४१.८० टक्के कुटुंबांकडे अद्याप शौचालय नसल्याचे वास्तव आहे. या सर्व कुटुंबांकडे येत्या मार्चपूर्वी शौचालयांची बांधणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा आहे. मात्र यंत्रणेच्या निष्क्रयतेमुळे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.
बाभूळगाव तालुका अपवादशौचालयांच्या बाबतीत जिल्ह्यातील केवळ बाभूळगाव तालुका अपवाद ठरला. या तालुक्यात १९ हजार ५६२ कुटुंब आहेत. या सर्व कुटुंबांकडे १९ हजार ५५३ शौचालये आहेत. त्यामुळे केवळ बाभूळगाव तालुक्यात संपूर्ण कुटुंबांकडे शौचालय असल्याचे बेस लाईन सर्वेक्षणातून पुढे आले. त्या खालोखाल कळंब तालुक्यातील ८०.२० टक्के कुटुंबांकडे शौचालये आहेत. पुसद तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ३६.२० टक्के कुटुंबांकडे शौचालय आहे.
झरी तालुका माघारलाहागणदारीमुक्त ग्रामपंचायतीत झरी तालुका जिल्ह्यात शेवटच्या स्थानी आहे. बाभूळगाव तालुक्यातील सर्व ६३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. या उलट स्थिती झरी तालुक्यात आहे. या तालुक्यातील ५५ पैकी केवळ तीन ग्रामपंचायतींना हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले. हे प्रमाण केवळ ५.५० टक्के आहे. घाटंजी तालुक्यातील केवळ ९.९० टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.