लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागेल त्याला शेततळे हा शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून संपूर्ण जिल्ह्यात ४ जून २०१८ अखेरपर्यंत ६ हजार ३१२ शेततळ्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे.गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही महत्वाकांक्षी योजना १७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयान्वये सुरू केली. यवतमाळ जिल्ह्यात २०१७ च्या खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत केवळ ६६ टक्केच पाऊस झाला. परिणामी रब्बी व उन्हाळी पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली. भविष्यात पडणारा पाऊस शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरविला तर शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस मदत होईल, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने शेततळ्यासंदर्भात विशेष मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे यात कृषी विभागासोबत जिल्ह्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा सहभागी झाल्यामुळे निश्चित उद्दिष्ट वेळेपूर्वीच गाठता आले.शेततळे निर्माण करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागामध्ये समन्वय साधण्यात आला. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठका तालुका स्तरावर घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना या योजनेचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांचा मशीनधारकाशी समन्वय घडवून आणला. समूह पध्दतीने शेततळे निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल्यामुळे शेतकरी व मशीनधारकाचा फायदा झाला. शेततळ्याचे अनुदान प्राप्त होताच मशीनधारकाला त्वरीत रक्कम अदा करण्यात येऊ लागली.यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण १६ तालुके मिळून ४ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. योजना सुरू झाल्यापासून दीड वर्षात म्हणजे २४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत केवळ १ हजार ६४९ शेततळे पूर्ण झाले होते. जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेऊन सर्व तालुक्यात प्रती दिवस ३३ ते ४० शेततळे याप्रमाणे कामे केली.सर्वांच्या समन्वयातून शेततळ्यामध्ये जिल्हा प्रथम : जिल्हाधिकारी डॉ. देशमुखमागेल त्याला शेततळे' या योजनेच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात संरक्षित सिंचन निर्माण होण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे निश्चित केले. शासन स्तरावर पाठपुरावा करून या योजनेसाठी इतर जिल्ह्याचा अखर्चित निधी यवतमाळ जिल्ह्यासाठी वळविण्यात यश मिळाले. सर्वांच्या समन्वयातूनच यवतमाळ जिल्हा हा मागेल त्याला शेततळे' या योजनेत राज्यात अव्वल ठरला. उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरी शेततळ्यांची कामे सुरूच राहणार आहे.
शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:27 PM
मागेल त्याला शेततळे हा शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे.
ठळक मुद्देनियोजनातून सहा हजार हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सोय