यवतमाळ : खासगी चारचाकी वाहनधारकाने कमरेचा पट्टा काढून एसटी बस चालकाला मारहाण केली. हा प्रकार सोमवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास येथील घाटंजी बायपासवर घडली. या प्रकाराची तक्रार अवधूतवाडी पोलिसात करण्यात आली. दरम्यान, तक्रार घेण्यास विलंब केल्याने काही एसटी कर्मचाऱ्यांनी यवतमाळ आगाराजवळ आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. ज्ञानेश्वर देवराव जाधव रा. यवतमाळ असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. ते घाटंजी येथून एमएच-०६ एस - ८०४५ क्रमांकाची एसटी बस घेऊन यवतमाळकडे येत होते. यवतमाळनजीक राष्ट्रीय महामार्गावर घाटंजी बायपासवर वळण पार करताना अपघात झाला. नागपूरकडून येत असलेल्या एमएच-३१ ईक्यू-११०१ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची बसला धडक बसली. चालक ज्ञानेश्वर जाधव हे स्टेअरिंगवर असतानाच त्यांना चारचाकी वाहनाच्या चालकाने खाली खेचले. पॅन्टचा पट्टा काढून मारहाण सुरू केली. कशीबशी सुटका करून जाधव हे यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात पोहोचले. या ठिकाणी तक्रार घेण्यास विलंब होत असल्याचे पाहून काही कर्मचाऱ्यांनी महामंडळाच्या यवतमाळ आगार समोर आंदोलन सुरू केले होते. यानंतर यवतमाळ आगारातील अधिकाऱ्यांनी अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठले. चालकाला मारहाण प्रकरणी चारचाकी वाहनधारकावर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती.
यवतमाळ : खासगी वाहनचालकानं स्टेअरिंगवरून खाली ओढले अन् एसटी चालकाला पट्ट्यानं मारलं
By विलास गावंडे | Published: January 22, 2024 3:52 PM