अविनाश साबापुरे, यवतमाळ: सध्या भारतात सुरू असलेल्या दोन गोष्टींवर अवघ्या जगाची नजर आहे. एक म्हणजे क्रिकेटचा वर्ल्डकप आणि दुसरे म्हणजे यवतमाळचा दुर्गोत्सव. होय, जगातील ९० देशातील नागरिकांना यवतमाळच्या दुर्गोत्सवाची भुरळ पडली असून तेथील ३ लाखांपेक्षा अधिक लोक हा उत्सव ऑनलाईन पाहत आहेत.
यवतमाळच्याच सुपूत्राने तयार केलेल्या संकेतस्थळामुळे ही गोष्ट शक्य झाली आहे. येथील चंद्रेश सेता यांनी १ ऑक्टोबर २०१६ रोजी ‘यवतमाळ नवरात्री डाॅट काॅम’ हे संकेतस्थळ तयार केले. पहिल्या वर्षी फारसा प्रतिसाद नसला तरी आता सहा वर्षात या संकेतस्थळाने जगाला यवतमाळच्या प्रेमात पाडले आहे. यंदा तब्बल ९० देशातून या वेबसाईटवरील यवतमाळच्या नवरात्रोत्सवाला ‘लाईव्ह’ पाहिले जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे, दोन हजार ७०० पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळांची नोंदणी यवतमाळ जिल्ह्यात आहे. एकट्या यवतमाळ शहरात पावणे दोनशे सार्वजनिक मंडळांकडून हा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो.
यवतमाळातील मूर्तिकारांच्या मूर्तिकलेने जिल्ह्याबाहेरच्या मंडळांनाही आकर्षित केलेय. एकदा ‘आई’चा चेहरा पाहावाच म्हणून दररोज हजारो भाविक यवतमाळ शहरात अनवाणी फिरत देवीचे दर्शन घेतात. परंतु, या उत्सवाची ख्याती जगभर पोहोचावी म्हणून सेता यांनी संकेतस्थळ निर्माण केले. त्यामाध्यमातून आता ९० देशांतील ३ लाखांपेक्षा अधिक लोक यवतमाळमधील देवीच्या मूर्तींचे दर्शन घेत आहेत. यामध्ये भारतासह अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, चिन, कॅनडा, जपान, जर्मनी, ब्राझील या देशातून सर्वाधिक ‘हिट’ मिळत असल्याचे चंद्रेश सेता यांनी सांगितले.
जागतिक वारसा म्हणून नोंद करा
देशातला पहिल्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून कोलकात्याच्या उत्सवाला मान आहे. युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून कोलकात्याच्या दुर्गोत्सवाची नोंद केली आहे. त्या खालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्सव म्हणून यवतमाळच्या दुर्गोत्सवाची कीर्ती आहे. खेड्यापाड्यातील हजारो नागरिक दररोज पायपीट करीत यवतमाळच्या दुर्गोत्सवातील देखावे पाहण्यासाठी येत आहेत. मात्र या खेड्यांसोबतच तब्बल ९० देशातील लोक हा उत्सव ऑनलाईन पाहत आहेत. यवतमाळच्या उत्सवालाही युनेस्कोच्या यादीत स्थान मिळावे, यासाठी पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.