यवतमाळ : यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात असलेला अत्यल्प जलसाठा आणि लांबलेल्या पावसामुळे यवतमाळ शहराला आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. २१ जूनपासून याची अंमलबजावणी होणार असून तसा प्रस्ताव नागपूरच्या आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.यवतमाळ शहरासाठी निळोणा आणि चापडोह प्रकल्प जीवनदायी आहे. या दोन प्रकल्पावरून शहर आणि शहरालगतच्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात ओव्हरफ्लो झालेला निळोणा प्रकल्प आता तळाला लागला आहे. या प्रकल्पाची १२६३ फूट ११ इंच साठवण क्षमता आहे.मात्र आता या प्रकल्पात केवळ ११ इंच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे यवतमाळकरांवर पाणीटंचाईचे भीषण संकट घोंगावत आहे. पावसाळा लांबल्याने त्यात आणखी भर पडली आहे. यवतमाळकरांना आवश्यक पाणी मिळावे म्हणून पाणीपुरवठ्याच्या वेळात बदल करण्यात येत आहे. पूर्वी एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता तीन दिवसाआड होणार आहे. म्हणजे आठवड्यातून दोनच दिवस नळ येतील. निळोणा प्रकल्प पूर्णत: गाळाने भरला असून ११ इंच पाणी शिल्लक असल्याने जीवन प्राधिकरणाने नियोजन केले आहे. त्यातही मृत साठ्यातील पाण्याचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त दोन पंप बसविण्यात आले आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार आहे.त्यामुळे २१ जूनपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाऊस आणखी लांबल्यास पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)
यवतमाळला तीन दिवसाआड पाणी
By admin | Published: June 14, 2014 2:27 AM